होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बार अडचणीत

नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बार अडचणीत

Published On: Jan 03 2018 1:29AM | Last Updated: Jan 03 2018 12:55AM

बुकमार्क करा
नवी मुंबई : प्रतिनिधी

31 डिसेंबर 2017 पर्यंत नुतनीकरण न केलेला नवी मुंबईतील ऑकेस्ट्रा बार आता अडचणीत आला आहे. केवळ 20 ऑर्केस्टा बार संचालकांनी नुतनीकरण प्रमाणपत्रासाठी पोलीस आयुक्तालयांकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यातही त्यांचे वीज, अग्‍निशमन यंत्रणा विभागाचे प्रमाणपत्र 31 डिसेंबरपर्यंतच वैध असल्याचे समजते. त्यामुळे या बारचेही भविष्य धोक्यात आले आहे. मुंबई येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये हॉटेल्स व पबमध्ये लागलेल्या आगीमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. त्याठिकाणी बर्‍याच अनियमितता असल्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. 

याच पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई येथील ऑर्केस्ट्रा बारसंदर्भात माहिती घेतली असता, 31 डिसेंबर 2017 पर्यंत केवळ 20 ऑर्केस्ट्रा बार आस्थापनांनी पोलीस आयुक्तालयाकडे नुतनीकरणासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे उर्वरित ऑर्केस्ट्रा बार आजघडीला अवैधरित्या चालविले जात असून हे बार त्वरित बंद करण्याचे आदेश नवी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहे.

2018 या वर्षाकरिता ऑर्केस्ट्रा बार आस्थापनांचे नुतनीकरण 31 डिसेंबर 2017 पर्यंत करणे गरजेचे आहे. मात्र या तारखेपर्यंत ऑर्केस्ट्रा बार चालकांनी नुतनीकणासाठी प्रस्ताव पाठविलाच नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलिसांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून  परिसरातील ऑर्केस्टा बारची पहाणी करून अहवाल मागविला आहे. तसेच अनियमितता असलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याबाबतही  पत्रात म्हटले आहे.