Fri, Dec 13, 2019 18:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरोधी पक्षनेता फोडणे लोकशाहीलाच गालबोट!

विरोधी पक्षनेता फोडणे लोकशाहीलाच गालबोट!

Published On: Jun 17 2019 2:11AM | Last Updated: Jun 17 2019 1:16AM
मुंबई : खास प्रतिनिधी

गल्ली ते दिल्ली भाजपाचेच सरकार असूनदेखील आता ते इतर पक्षातल्यांना फोडत आहेत, त्यांच्याकडे माणसे नाहीत की काय?असा उद्विग्न सवाल करीत विरोधी पक्षनेत्यांना फोडून सरकारने लोकशाहीलाच गालबोट लावले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी केली. 

अजित पवार म्हणाले, ज्यांनी या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेऊन या सरकारमध्ये मंत्री केले गेले आहे. मात्र सरकारला या आरोपांची उत्तरे द्यावीच लागतील असेही अजित पवार यांनी बजावले. केवळ सहा  मंत्र्यांना काढून चालणार नाही. फडणवीस सरकारमध्ये अनेक मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पवार यांनी केली. 

विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर काँगेेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टिवार यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळणे तर दूरच उलट 12-13 टक्के दराने व्याज आकारून त्यांची लुटमार चालू आहे.  दुष्काळामुळे ज्या शेतकर्‍यांना कर्ज फेडणे शक्य झाले नाही त्यांना कर्जमाफी मिळणे आवश्यक होते. परंतु सध्याचे फडणवीस सरकार शेतकर्यांच्या पुनर्गठीत कर्जावर 12 ते 13 टक्के दराने जाचक व्याज आकारणी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

वडेट्टीवार विरोधी पक्षनेतेपदी? 

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नेमणुक करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी दिली.
 मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. भाजपा सरकारचे राज्यातले हे अखेरचे अधिवेशन आहे, विधानसभा निवडणुकीत जनता सत्ताधार्‍यांना सत्तेपासून दूर करेल, असेही विरोधकांनी म्हटले आहे.

अधिवेशन सुरळीत चालवूया : तावडे यांचे आवाहन

विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजात जनतेचे अधिकाधिक प्रश्‍न मार्गी लावण्याच्या दृष्टीने विधीमंडळाचे कामकाज सुरळित चालविले गेले पाहिजे, असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना केले. 

विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर तावडे यांनी रविवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले,  पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत विरोधी पक्षांचा कोणत्या चर्चा व विषयांचा आग्रह आहे, त्यासंदर्भात  या भेटीत चर्चा झाली. अधिवेशनात जनतेचे प्रश्‍न चर्चेने एकत्र सोडविण्याबाबत विरोधकांनीही सहमती दर्शविली.