Wed, Mar 20, 2019 08:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तिहेरी तलाक विरोधातील कायद्यास मुस्लिम समाजातून विरोध

तिहेरी तलाक विरोधातील कायद्यास मुस्लिम समाजातून विरोध

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 1:31AM

बुकमार्क करा
मुंबई : खलील गिरकर 

केंद्र सरकारने तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारे विधेयक लोकसभेत मंजूर केल्याने मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. केंद्र सरकारची ही कार्यवाही म्हणजे इस्लाममध्ये हस्तक्षेप असून या प्रकाराविरोधात वेळीच आवाज उठवला नाही तर भविष्यात सरकार इस्लाममध्ये प्रत्येक बाबीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे आताच तीव्र विरोध करण्याचा निर्णय समाजातील मौलाना व धार्मिक नेत्यांनी घेतला आहे. या कायद्याविरोधात मुस्लिम समाजात जनजागृती करण्यात येणार असून मंगळवारी मौलानांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर शुक्रवारी दोन टाकी येथील ईदगाह मैदानावर मौलाना व सर्वसामान्य मुस्लिम नागरिकांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. वेळ पडल्यास या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. शरियत वाचवा आंदोलन या नावाने हे अभियान राबवण्यात येणार आहे. 

या कायद्याच्या विरोधात शुक्रवारी नमाजनंतर मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. मंगळवारी मौलानांची बैठक जामिया काद्रिया अश्रफिया येेथे होईल व त्यामध्ये याबाबत चर्चा करून पुढील आंदोलनाची रूपरेखा ठरवण्यात येईल. सोमवारी रझा अकादमीच्या कार्यालयात अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नुरी व मौलाना मोईनुद्दीन अश्रफ यांची विविध भागातून आलेल्या मौलानांची बैठक झाली. त्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी मुस्लिम समाजातील वकिलांची बैठक इस्लाम जिमखानामध्ये घेण्यात येणार आहे. त्यामध्ये या विधेयकामधील कायदेशीर बाबींना कशा पद्धतीने विरोध करता येईल, याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. हा कायदा बनवताना सरकारने इस्लामच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला असून सरकारला हा अधिकार नसल्याचा दावा मौलानांनी केला आहे.