होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिडे गुरुजींच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक 

भिडे गुरुजींच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

संभाजी भिडे गुरुजींच्या अटकेवरुन भारिपने आझाद मैदानावर धडक दिली असताना त्यांच्या अटेकेसाठी विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले. संभाजी भिडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला असताना आणि ते पत्रकार परिषदेत पत्रकारांना भेटत आहेत तर पोलिसांना का सापडत नाहीत? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विरोधी पक्षाच्या अन्य नेत्यांनी केला. सरकार संभाजी भिडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला. 

नियम 293 अन्वये कायदा आणि सुव्यस्थेसबंधी विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेवेळी कोरेगाव येथील हिंसाचार आणि संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजला. ज्या कोरेगाव भिमा प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेला अटक करण्यात आली. त्याच गुन्ह्यात आरोपी असलेल्या संभाजी भिडेंना अटक का केली जात नाही, असा सवाल करुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोरेगाव भिमा दंगलीला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे कारणीभूत असल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर मिलिंद एकबोटेंना अटक करण्यात आली. मात्र, संभाजी भिडेंना अटक केलेली नाही. गुन्हा एकच असताना दोघांना वेगळा न्याय कसा कसा? संभाजी भिडेंना कोणाच्या आदेशावरून वाचविले जात आहे. भिडेंच्या आडून राज्यात जातीय दंगली निर्माण करण्याचे षडयंत्र आखले जात आहे का, असा सवालही चव्हाण यांनी केला. सनातन संस्थेवर अनेक गंभीर आरोप आहेत. आघाडी सरकारने या संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाचे काय झाले, याचे उत्तरही दिले पाहिजे, असे चव्हाण यांनी सांगितले. 

या चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मिरज दंगलीचे आरोपी असलेल्या भिडेंची राज्य सरकारने पद्मश्रीसाठी शिफारस करुन बहुजन समाजात फूट पाडण्याच्या प्रवृत्तीला बळ दिल्याचा आरोप केला. भीमा कोरेगावची घटना घडली याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी एकही मंत्री तेथे गेले नाहीत. तिथे काय होणार हे सरकारमधील लोकांना आधीच माहिती होते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला. 

Tags : mumbai, mumbai news, Bhide Guruji, for arrest, Opposition aggressor,


  •