Wed, Apr 24, 2019 15:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारच्या आश्‍वासनांना जनता कंटाळली

सरकारच्या आश्‍वासनांना जनता कंटाळली

Published On: Mar 07 2018 2:08AM | Last Updated: Mar 07 2018 1:41AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

आश्‍वासनांची खैरात करणार्‍या सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडली असताना राज्यात 2025 पर्यंत 1 हजार अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे दिवास्वप्न दाखवून हे सरकार जनतेला भुरळ घालत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली.

भाजपा सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलच्या ठरावावरील चर्चेत ते बोलत होते. मुंडे म्हणाले, शेतकरी कर्जमाफी योजनेचा ऑनलाईनमुळे बोजवारा उडाला असतानाही आतापर्यंत 29 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी दिले असल्याचा दावा सरकार करत आहे. हिंमत असेल तर सरकारने कर्जमाफी दिलेल्या शेतकर्‍यांची नावे जाहीर करावीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आतंरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाला विलंब लावला जात आहे. इंदू मिलच्या जागेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची साधी वीटही रचली नाही, अशा शब्दात मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अभिनंदनाचा   ठराव मांडताना दरेकर यांनी सरकार सर्व घटकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत असल्याचे सांगितले. चांगल्या गोष्टी पाहण्याची सवय नसलेले विरोधक सरकारविरोधात नाहक रान उठवत आहेत. सरकारच्या पारदर्शी कारभारामुळे व्यवस्थेतली गळती बंद होऊन कोट्यवधी रुपयांची बचत झाली असल्याचा दावाही दरेकर यांनी केला. शिवसेनेच्या अनिल परब यांनी या अभिनंदन ठरावाला अनुमोदन दिले. भाई जगताप, जयंत पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, किरण पावसकर, प्रसाद लाड आदींनीही या चर्चेत सहभाग घेतला.