Sat, Jul 20, 2019 15:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बागडेंच्या विरोधात विरोधकांचा अविश्‍वास प्रस्ताव

बागडेंच्या विरोधात विरोधकांचा अविश्‍वास प्रस्ताव

Published On: Mar 06 2018 1:49AM | Last Updated: Mar 06 2018 1:49AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात विरोधकांनी सोमवारी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. बागडे हे सभागृहात पक्षपाती व नियमबाह्य काम करीत असल्याने त्यांना अध्यक्षपदावरुन दूर करण्यात यावे, अशी मागणी या प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे. आता नियमानुसार कामकाजाच्या 14 दिवसांनंतर याच अधिवेशनात हा प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता आहे. 

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलंबनाच्या मागणीवरुन विधानसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटताना विरोधी पक्षांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मुख्यमंत्री सभागृहात बोलत असताना देखील सत्ताधारी सदस्यांचा सभागृहात गदारोळ सुरु होता. त्यावेळी अध्यक्षांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जागेवर बसण्याचे आदेश न देता राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठराव मतास टाकून तो मंजूर केला, असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.  

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सभागृह हे सार्वभौम आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्व सदस्यांना आपली मते मांडण्याची संधी द्यायला हवी. अध्यक्ष हे कोणत्याही एका पक्षाचे नसतात. परंतु, सभागृहातील त्यांची वर्तणूक सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असल्यासारखीच आहे. सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा व मतदान अपेक्षित होते. राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही आम्हाला चर्चा करायची होती. फसवी शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाई यांसारखे अनेक प्रश्‍न विरोधी पक्षांना सभागृहात मांडायचे होते. परंतु, सत्ताधारी पक्षच कामकाज होऊ देत नव्हता. सभागृह चालवण्याची जबाबदारी असलेले अध्यक्षही कामकाज सुरळीत चालावे, यासाठी प्रयत्न करीत नव्हते. उलटपक्षी सभागृह तहकूब करून विरोधकांची बोलण्याची संधी डावलली जात होती. त्यामुळे विरोधी पक्षांना नाईलाजाने अविश्‍वास प्रस्तावाचा निर्णय घ्यावा लागला, असेही त्यांनी सांगितले. 

विरोधकांची सरकारकडून सभागृहात मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असताना त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही विधानसभा अध्यक्षांची असते. त्यांनी आम्हाला न्याय देणे अपेक्षित  असते. मात्र, अध्यक्षच पक्षपाती भूमिका घेत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार म्हणाले. 

धनंजय मुंडे यांनी स्वतः त्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधिमंडळाची उच्चस्तरीय चौकशी नेमण्याची तयारी दाखवली. आम्ही देखील त्याला तयार असल्याचे मी म्हणालो. मात्र, मुख्यमंत्री बोलत असताना सत्‍ताधारी पक्षाचेच आमदार घोषणा देत होते. यावरूनच त्यांना सभागृह चालवायचे नाही हे स्पष्ट दिसून येत होते. आम्हाला गारपीट, कर्जमाफी, बोंडअळी यासारख्या महत्वाच्या प्रश्‍नांवर बोलायवे होते. मात्र आम्हाला बोलण्याची संधीच दिली जात नाही असे सांगून  अध्यक्ष हे लोकशाही उध्वस्त करायला निघाले आहेत काय असा सवालही अजित पवार यांनी केला.

निर्णय होईपर्यंत आसन टाळावे : अजित पवार  

जेव्हा विधानसभा अध्यक्षांवर अविश्‍वासाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर निर्णय होईपर्यंत अध्यक्ष आसनावर बसत नाहीत, असा प्रघात आहे. अशा वेळी उपाध्यक्ष कामकाज पाहत असतात. मात्र गेली साडेतीन वर्षे झाली तरी विधानसभा उपाध्यक्ष नेमले गेले नाहीत. अशावेळी तालिका अध्यक्षांनी कामकाज पहावे, असे सांगतानाच  अध्यक्ष हरिभाउ बागडे आपली सदसदविवेकबुध्दी जागृत ठेवतील अशी अपेक्षा अजित पवार यांनी बोलून दाखविली.