Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरोधकांची आझाद मैदानात हजेरी

विरोधकांची आझाद मैदानात हजेरी

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:38AMमुंबई :  प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आरिफ नसिम खान यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी दुपारी आझाद मैदानाकडे कूच केली व आंदोलन करणार्‍या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या मार्गी लावण्यासाठी सभागृहात प्रश्‍न मांडण्याची ग्वाही दिली. विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून प्रश्‍न समजून घेतले व सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

सत्ताधारी भाजप, शिवसेनेने हे प्रश्‍न सोडवले नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हे प्रश्‍न सोडवण्याची ग्वाही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिली. मात्र, सत्ता आल्यावर आपला शब्द पाळा, असे सुनावण्यास आंदोलनकर्त्यांनी कमी केले नाही. राज्याच्या विविध भागातून विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी नागरिकांनी अधिवेशनाचा मुहूर्त साधून मुंबई गाठली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना त्वरित अटक करावी व खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, लहुजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करावी, अनुसूचित जाती व जमातीसाठी निर्माण केलेली आर्थिक विकास महामंडळे पुन्हा सुरू करावीत, मुंबईमध्ये शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची व पुणे येथे क्रांतिगुरू  लहूजी वस्ताद साळवे यांची स्मारके तत्काळ उभारावीत, अशी मागणी अण्णाभाऊ साठे यांच्या वारसदारांनी केली. त्यामध्ये सावित्री साठे, ज्योती साठे, गणेश भगत, सचिन साठे, सुवर्णा साठे, अविनाश भगत यांचा समावेश होता.