Sun, Jul 21, 2019 15:12
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षण : विरोधकांचे राज्यपालांना साकडे

आरक्षण : विरोधकांचे राज्यपालांना साकडे

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 1:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांच्या बैठका घेत आरक्षणासाठी राज्यपालांना साकडे घातले. मराठा समाजाचे आंदोलन पेटले असताना राज्य सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेसने मराठा आरक्षणाबरोबरच धनगर, मुस्लीम आणि महादेव कोळी आरक्षणाचीही मागणी केली आहे. काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाही दिला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर बैठक झाली.

आरक्षणावरून संपूर्ण महाराष्ट्रात असंतोषाचा वणवा पेटला असताना ठोस निर्णय घेण्यात सरकार साफ अपयशी ठरल्याने मराठा समाजासह इतरही समाजांचा उद्रेक झाल्याचे आमदारांनी सांगितले. यासंदर्भात जनतेची बाजू मांडण्यासाठी राज्यपालांची तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानंतर काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वत्र आणि दररोज सुरू असलेल्या आंदोलनांची माहिती राज्यपालांना दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली आणि प्रमोद पाटील यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्मत्याग केला. राज्यात अनेक बळी गेल्यानंतरही अद्याप या मुद्द्यावर सरकारचे धोरण उदासीनच असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

खा. अशोक चव्हाण यांनी, आरक्षणाबाबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची भूमिका संदिग्ध असून त्यामुळेच मराठा, मुस्लीम, धनगर व इतर समाजांच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेतले जात नाहीत. उलटपक्षी हे प्रश्‍न प्रलंबित रहावे, अशीच सरकारची मानसिकता असल्याचा आरोप केला.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, न्यायालयाच्या नावाखाली सरकार जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्याचे सांगितले. तर नसिम खान यांनी, न्यायालयाने वैध ठरवलेल्या मुस्लिमांच्या आरक्षणाची सरकारने अंमलबजावणी केली नसल्याकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. सध्याच्या आरक्षणाला धक्‍का न लावता विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारने अधिक वेळकाढूपणा न करता तातडीने निर्णय जाहीर करावा, असे निर्देश त्यांनी द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल लवकरात लवकर सादर करण्याची विनंती केली.