Thu, Feb 21, 2019 08:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विमानसेवा सुरळीत झाल्यावरच उद्घाटन

विमानसेवा सुरळीत झाल्यावरच उद्घाटन

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 12:48AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर विमानतळावरून विमानसेवेचा प्रारंभ झाला असला तरी जोपर्यंत विमान वाहतूक सुरळीत होत नाही, तोपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन करायचे नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विमानसेवा कार्यान्वित झाल्याने या विमानतळाच्या उद्घाटनाला येण्याची तयारी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी दाखविली होती. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विमान महिनाभर सुरळीतपणे चालल्यानंतरच उद्घाटन करावे, अशी भूमिका घेतल्याने ते लांबणीवर पडले आहे.

कोल्हापूरमधून विमानसेवा सुरू व्हावी, ही अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन करून ते लोकार्पण केले जाणार आहे. हे विमानसेवा कार्यान्वित झाल्याची माहिती सुरेश प्रभू यांना त्यांच्या विभागामार्फत देण्यात आली असता त्यांनी या विमानतळाच्या उद्घाटनाला येण्याची इच्छा प्रकट केली. त्याबाबत राज्य सरकारला माहिती कळविण्यात आली आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ही विमानसेवा सुरळीतपणे सुरू झाल्याशिवाय उद्घाटन करू नये, अशी भूमिका घेतली आहे. किमान महिनाभर तरी विमान वाहतूक व्यवस्थित सुरू राहिल्यानंतर उद्घाटन केले जाणार आहे, तशी माहिती प्रभू यांना कळविण्यात आल्याचे समजते.