Sun, Jun 16, 2019 02:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उघड्यावर शौच, लघुशंका पडणार महागात

उघड्यावर शौच, लघुशंका पडणार महागात

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 1:15AM

बुकमार्क करा
मुंबई : संदेश सावंत

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा एक भाग म्हणून मार्च 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्यात करण्यात आला आहे. मात्र बहुतांश ठिकाणी आजही उघड्यावर शौचास बसणे बंद झालेले नाही. हे लक्षात घेता यापुढे उघड्यावर शौचास बसणे, लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे तसेच स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात उघड्यावर शौचास बसणार्‍यांना 500 तर लघुशंकेसाठी 200 रुपये दंड आकारण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.

राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही.  अशा व्यक्तींना वैयक्तिक अथवा सामुदायिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश नगरविकास तसेच स्वच्छता विभागाकडून देण्यात आले आहेत. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 1 ऑक्टोबरला झालेल्या कार्यक्रमात राज्याचा नागरी भाग हा हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. मात्र बर्‍याच ठिकाणी आजही उघड्यावर शौचास जाणे, लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणे थुंकणे तसेच रस्ते व महामार्गावर घाण करण्याचे प्रकार बंद झालेले दिसत नसल्याने घनकचरा व्यवस्थापन नियमावलीतील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नागरी भागात स्वच्छतेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येतो. आवश्यक सुविधा दिल्यावरही ज्या नागरिकांकडून स्वच्छतेसाठी सहकार्य करण्यात येत नाही. अशा व्यक्ती, संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियमातील तरतुदींचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले असून त्यासाठी दंडाची रक्कम देखील ठरवून देण्यात आली आहे. अस्वच्छता किंवा घाण म्हणजे काय? याची व्यख्या देखील यासंदर्भातील आदेशात करून देण्यात आली आहे.