Tue, Jul 23, 2019 04:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे रॅकेट उघड

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे रॅकेट उघड

Published On: Aug 15 2018 11:59PM | Last Updated: Aug 15 2018 11:26PMमुंबई : प्रतिनिधी

आंतराष्ट्रीय मानवी तस्करीत सहभागी असलेल्या दोन टोळ्यांचा सहार आणि वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी अटक केली. राजूभाई गमलेवाला आणि इम्तियाज अब्दुल करीम मुकादम अशी या दोघांची नावे आहेत. यातील राजूभाईने गुजरातमधील सुमारे 300 हून अधिक अल्पवयीन मुलांना विदेशात पाठविल्याचे बोलले जाते. ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

अंधेरी येथे प्रिती सूद नावाची एक अभिनेत्री राहत असून 4 मार्च 2018 रोजी ती यारी रोडवरील श्रुंगार या  ब्युटीपार्लरमध्ये गेली होती. या ब्युटीपार्लरमध्ये दोन अल्पवयीन मुलींना मेकअप करण्यासाठी आणले होते. या दोेन्ही मुली मूळच्या गुजरातच्या असून त्यांना अमेरिकेत पाठविले जाणार आहे अशी माहिती तिला समजली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने कंट्रोल रुमला ही माहिती दिली. या माहितीनंतर वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे जाऊन या दोन्ही मुलींची सुटका केली. चौकशीत या मुलींना तस्करीमार्गे विदेशात पाठविले जाणार होते. 

याच गुन्ह्यात नंतर  ताजुउद्दीन अब्दुलगनी खान, रिझवान इब्राहिम चोटाणी, अफजल इब्राहिम शेख, आमीर अझहर खान या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. या चौघांच्या चौकशीत राजूभाई नावाच्या एका एजंटचे नाव समोर आले होते. राजूभाई हा गुजरातच्या अहमदाबाद शहरात राहत असून तोच गरीब मुलांना मुंबईत आणून त्यांना बोगस पासपोर्ट आणि व्हिसाद्वारे अमेरिकेत पाठवित असल्याचे उघडकीस आले. यापूर्वीही त्याने अशाच काही मुलांना विदेशात पाठविले होते. त्यामुळे या राजूभाईचा वर्सोवा पोलिसांनी शोध सुरु केला होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना चकवून पळून जात होता. अखेर पाच महिन्यानंतर सोमवारी त्याला अहमदाबाद येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 18 ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
राजूभाईच्या चौकशीत त्याने आतापर्यंत अकरा ते सोळा वयोगटातील अनेक मुले-मुलींना विदेशात पाठविले होते. ही एक आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणारी टोळी असून तो या टोळीचा म्होरक्या म्हणून काम पाहत होता. आतापर्यंत त्याने मानवी तस्करीमधून 45 ते 50 रुपये कमिशन म्हणून घेतले आहे. अमेरिकेतील स्थानिक एजंटच्या मदतीने मानवी तस्करीचा व्यवसाय सुरु होता. राजूभाईने आतापर्यंत तीनशेहून अधिक मुलांना विदेशात पाठविल्याचे बोलले जाते. या मुलांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अन्य एका घटनेत इम्तियाज अब्दुल करीम मुकादम या 49 वर्षीय आरोपीस मंगळवारी सहार पोलिसांनी अटक केली. इम्तियाज हा जोगेश्‍वरी परिसरात राहतो. नोव्हेंबर 2016 रोजी तो अमेरिकेत गेला होता. टुरिस्ट व्हिसावर त्याने मुकादम मेहक इम्तियाज आणि मुकामद मोहम्मद हमजा इम्तियाज या दोन अल्पवयीन मुलांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल 2017 रोजी तो एकटाच दिल्ली विमानतळावर आला होता. यावेळी त्याच्यासोबत ती दोन्ही मुले नव्हती. जाताना त्याने ती दोन्ही मुले त्याचीच असल्याचे सांगितले होते. हा प्रकार अलीकडेच इमिग्रेशन अधिकारी असलेल्या अरुणकुमार शशीकुमार यांच्या लक्षात येताच त्यांनी गुरुवारी सहार पोलीस ठाण्यात इम्तियाजविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी मानवी तस्करीचा गुन्हा नोंद होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याची दोन्ही मुले सध्या शिक्षण घेत असून ती कधीच अमेरिकेत गेलेली नाहीत. याच मुलांच्या नावावर तो इतर मुलांची तस्करी करीत होता. नोव्हेंबर 2016 मध्ये त्याने अमेरिकेत नेलेल्या मुलांची तस्करी केल्याची कबुली दिली आहे. याकामी त्याला नालासोपारा येथे राहणारा उबेर बर्तनवाला आणि गुजरातच्या राजकोटमध्ये राहणार्‍या कनूभाई पटेल यांनी मदत केली होती. या दोन्ही आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत.