Mon, Jun 24, 2019 16:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊदच्या परतण्याची फक्‍त अफवाच

दाऊदच्या परतण्याची फक्‍त अफवाच

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 2:02AMमुंबई : प्रतिनिधी

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकरने भारतात परतण्याची कोणतीही इच्छा व्यक्‍त केलेली नाही. ती फक्‍त अफवा आहे, असा खुलासा दाऊदचा उजवा हात मानला जाणारा गँगस्टर छोटा शकीलने गुरुवारी केला. एका दूरचित्रवाहिनीला फोनवर त्याने सांगितले की, जोपर्यंत मी काही सांगत नाही तोपर्यंत कशावरच विश्‍वास ठेवू नका. दाऊदचा भाऊ इक्बालच्या वतीने ठाणे न्यायालयात बाजू मांडताना त्याचे वकील श्याम केसवानी यांनीच ही माहिती दिली आहे, याकडे लक्ष वेधले असता शकील म्हणाला, केसवानीला काय आणि कुणालाच काय दाऊदबद्दल कसे काही माहीत असणार? त्याच्याबद्दल कुणालाही काहीच माहिती असण्याचे कारण नाही. 

दरम्यान, अ‍ॅड. केसवानी यांनीही आपल्या विधानावरून घुमजाव केले आहे. त्यांनी सांगितले की, सहा-सात वर्षांपूर्वी जे घडले ते मी न्यायालयाला सांगत होतो. दाऊदने एका मोठ्या वकीलाशी बोलताना (अ‍ॅड. राम जेठमलानी) भारतात परतण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. आपल्याला आर्थर रोड जेलमध्येच ठेवावे आणि तिथेच खटल्याचे कामकाज चालावे अशी त्याची अट होती... हा तेव्हाचा घटनाक्रम मी ऐकवला. त्याचा माध्यमांनी जणू काही हे ताजे घडले आहे असा अर्थ लावला. दाऊदचा ठावठिकाणा सांगू शकाल काय? या प्रश्‍नावर अ‍ॅड. केसवानी यांनी नकारार्थी मान हालवली.