Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात फक्‍त एकच पोलीस तक्रार प्राधिकरण!

महाराष्ट्रात फक्‍त एकच पोलीस तक्रार प्राधिकरण!

Published On: Jan 21 2018 2:49AM | Last Updated: Jan 21 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

पोलिसांविरोधातील जनतेच्या तक्रारींची निवारणा करण्यासाठी गेल्यावर्षी स्थापन करण्यात आलेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या 649 तक्रारींपैकी 196 तक्रारी निकाली काढल्या आहेत. यातील 259 प्रकरणांची सुनावणी सुरू असून 194 प्रकरणे तपासाखाली असताना राज्यात पुणे वगळता अन्य कोठेही विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवरून निर्णय देत पोलिसांविरोधातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 2014 साली महाराष्ट्र पोलीस कायद्यात सुधारणासुद्धा करण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात 5 जानेवारी 2017 पासून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्या. ए. व्ही. पोतदार हे असून राज्याचे माजी अप्पर पोलीस महासंचालक पी. के. जैन, नागरी समाजाचे उमाकांत पाटील, राज्य शासनाच्या सेवेतील अप्पर पोलीस महासंचालक अस्थापनाचे राजेेंद्र सिंह हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. 

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे राज्याच्या पातळीवर कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती असे विभाग कार्यरत असून फक्त पुण्यामध्ये विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त म्हणजेच उपविभागीय अधिकार्‍यापासून ते थेट पोलीस महासंचालकांविरोधातील तक्रारी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे, तर पोलीस शिपाई ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकापर्यंच्या तक्रारी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे करण्याचे प्रावधान आहे. मात्र प्रत्यक्षात विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणे अस्तित्वात न आल्याने राज्यातील सर्व तक्रारींचे निवारण करण्याचे काम या प्राधिकरणाकडून सुरू असल्याचे न्या. पोतदार यांनी सांगितले.

प्राधिकरण सुरू झाल्यापासून राज्यभरातून तब्बल 649 तक्रारी प्राप्त झाल्या. यातील 196 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून यातील एकावर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. उरलेली 195 प्रकरणे कारवाईसाठी राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याची माहिती मिळते. तर प्राधिकरणाकडे 259 प्रकरणांची सुनावणी सुरू असून उरलेली 194 प्रकरणे तपासाखाली ठेवण्यात आली आहेत. तर पुण्यामध्ये विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण सुरू करण्यात आल्याने पुण्यातील 140 तक्रारींपैकी 37 प्रकरणे तपासासाठी त्यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे न्या. पोतदार म्हणाले. ते प्राधिकरणाच्या वर्षपूर्ती निमित्त कूपरेज टेलिफोन निगम इमारतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत  होते.

पोलीस ठाण्यातील अधिकारी आपली तक्रार किंवा गुन्हा दाखल करुन घेत नसेल, पोलीस अधिकारी, अंमलदार दमदाटी करत असेल, कारवाई करण्यास टाळाटाळ करत असेल, तसेच पोलिसांनी केलेली कोठडीत मारहाण, धमकावणे, कोठडीतील मृत्यू, अवैधरित्या व्यक्तीचा घेतलेला ताबा, पद व अधिकारांचा केलेला गैरवापर अशा पोलिसांविरोधातील तक्रारी लेखी स्वरुपात पीडित नागरिकांना या प्राधिकरणाकडे करता येतात. खोट्या तक्रारी येऊ नयेत म्हणून प्राधिकरण तक्रारदार व्यक्तीकडून अ‍ॅफिडेव्हिट भरून घेते. त्यानंतर तक्रारींची शहानिशा करुन पुढील कारवाई सुरु करण्यात येते. दरम्यान, तक्रार खोटी निघाल्यास तक्रारदार व्यक्तीवर दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे पीडित नागरिकाने धाव घेतल्यास त्याच्या तक्रारीची शहानिशा करत पुढील कारवाई सुरु करण्यात येते. त्यामध्ये संबंधित पोलीस ठाण्याला नोटीससुद्धा पाठविली जात असल्याने प्राधिकरणाकडे तक्रार दिल्याची माहिती मिळताच पोलीस ठाणी स्वत:हून कारवाई करत गुन्हे दाखल करत असल्याचेही प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर दिसून आले आहे. तर काही घटनांमध्ये कारवाईची गरज आवश्यक वाटल्यास प्राधिकरणाकडून स्वत: याची दखल घेत, तपास सुरू करण्यात येतो, असे जैन यांनी यावेळी बोलताना सांगितले.