Mon, Aug 26, 2019 08:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या मतदार यादीत केवळ ६३० तृतीयपंथीय

मुंबईच्या मतदार यादीत केवळ ६३० तृतीयपंथीय

Published On: Apr 26 2019 1:48AM | Last Updated: Apr 26 2019 1:48AM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत 29 एप्रिलला होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत केवळ 630 तृतीयपंथीय मतदारांनी नोंदणी केली आहे. 

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील जोगेश्‍वरी-पूर्व, विक्रोळी, विलेपार्ले, वडाळा, शिवडी आणि कुलाबा या सहा विधानसभा मतदारसंघात एकही तृतीयपंथीय म्हणून नोंद झालेली नाही, हे विशेष. निवडणूक आयोगाने सदिच्छा दूत म्हणून नेमणूक केलेल्या श्रीगौरी सावंत यांनी ‘दै. पुढारी’ला सांगितले की, मुंबईत बहुतेक तृतीयपंथीय हे दक्षिणेकडील राज्यांतून स्थलांतरीत होऊन आलेले आहेत. त्यांचे मूळ रहिवाशी पुरावेे त्या-त्या राज्यातील आहेत. परिणामी, मतदार नोंदणीत त्यांचा आकडा कमी आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही तृतीयपंथीयांसाठी सरकारने कल्याणकारी मंडळाची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केल्याने त्यांना कोणतेही फायदे मिळणार नाहीत. या आणखी एका कारणामुळे नोंदणीत निरूत्साह दिसतो. 

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेकडून पाच हजार तृतीयपंथीयांना सेवा दिली जात आहे. याचाच अर्थ अद्यापही तृतीयपंथीयांची नाव नोंदणी करण्यासाठी शासनाला अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.