Tue, Apr 23, 2019 14:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रातही एप्रिलपासून ऑनलाईन लॉटरी

महाराष्ट्रातही एप्रिलपासून ऑनलाईन लॉटरी

Published On: Jan 19 2018 9:52AM | Last Updated: Jan 19 2018 9:46AMमुंबई : चंदन शिरवाळे

परराज्यातील लॉटर्‍यांमुळे महसुलावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागल्याने आता महाराष्ट्र सरकारसुद्धा एप्रिलपासून ऑनलाईन लॉटरी सुरू करणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. 

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारची कागदी लॉटरी सुरू आहे. या लॉटरी विक्रीच्या माध्यमातून शासनाला दरवर्षी 200 ते 215 कोटी रुपये महसूल मिळत होता. राज्यातील विविध विकास कामांसाठी या महसुलाचा वापर केला जात होता; पण गेल्या तेरा वर्षांपासून राज्यात सिक्‍कीम, गोवा, बोडोलँड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि आसाममधील ऑनलाईन लॉटर्‍यांचे पेव फुटल्यामुळे कागदी लॉटरीच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. मराठी लॉटरी विक्रेत्यांवर बेरोजगारीचे संकट निर्माण करणार्‍या ऑनलाईन लॉटर्‍या बंद करण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला होता. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

राज्यात विविध लॉटरी विक्रीच्या माध्यमातून शासनाला सध्या दरवर्षी 132 कोटी रुपये मिळत आहेत. त्यामध्ये परराज्यातील ऑनलाईन लॉटरीचे 125 कोटी, तर कागदी लॉटरीद्वारे मिळणार्‍या सात कोटी रुपयांचा समनावेश आहे. याउलट महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्य असलेल्या केरळला 1300 कोटी रुपये महसूल मिळत आहेत. केंद्र सरकारला लॉटरी विक्रीपासून दोन हजार कोटी रुपये दरवर्षी महसूल मिळत होता. संगणक क्रांतीचा विविध राज्यांमधील लॉटरी चालकांनी लाभ उठवल्यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये ऑनलाईन लॉटर्‍या सुरू झाल्या आहेत.

कागदी लॉटर्‍यांचे ड्रॉ (निकाल) आठवडा किंवा महिन्यातून एकदा लावले जात असत. दिवाळी, दसरा बंपरसारख्या निकालासाठी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, ऑनलाईन लॉटर्‍यांचा निकाल दिवसातून दोन ते तीन वेळा लावला जातो. झटपट निकालांमुळे या लॉटर्‍या लोकप्रिय झाल्यामुळे देशातील कागदी लॉटर्‍यांवर गंडांतर आले आहे. ऑनलाईन लॉटरींच्या माध्यमातून पूर्वेकडील राज्यांचा वाढणारा महसूल पाहून आता महाराष्ट्र शासनही ऑनलाईन लॉटरी सुरू करणार आहे.