लॉकडाऊनमध्ये पालिका विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे

Last Updated: Mar 27 2020 12:19AM
Responsive image


मुंबई :  पुढारी डेस्क

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अख्खा देश लॉकडाऊन झालाय. मुंबई आधीच लॉकडाऊन आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द झाल्यात. मुले घरी बसून कंटाळली आहेत. मात्र मुंबई महापालिकेच्या दहिसर पूर्व येथील शाळेने अनोखा ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम राबवत मुलांना घरबसल्या आनंदी ठेवले आहे. या शाळेने अ‍ॅन्ड्रॉइड फोनवर सहजगत्या डाऊनलोड करता येईल असा उपक्रम तयार केलाय. या माध्यमातून प्रश्‍नोत्तरे आदींसारखे मुलांच्या बुद्धीला खाद्य देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचबरोबर शहरातील महापालिकेच्या अनेक शाळांनी स्मार्ट फोनचा वापर करून मुलांच्या ज्ञानात भर घालण्यास सुरूवात केली आहे. 

महापालिकेच्या शिक्षण विभागाने टेलिग्राम हा चॅट प्लॅटफॉर्म वापरून मुलांना सूचना दिल्या. तसेच यादरम्यान काही व्हिडीओही शेअर करण्यात आले त्यात पालिकेच्या पवई पाचपोली शाळेतील शिक्षिका वृषाली खाडे यांनी कोरोना व्हायरसची माहिती देणारा व्हिडीओ तयार करण्याची सूचना विद्यार्थ्यांना दिली. त्यासाठी त्यांनी अचूक माहिती मुलांना शेअर केली. नंतर हा व्हिडीओ युट्युब चॅनेलवर शेअर करण्यात आला. खाडे यांनी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार करून दररोजचा गृहपाठ देण्यास सुरूवात केली. तो गृहपाठ करून विद्यार्थी त्यांच्याकडे पुन्हा पाठवतात. तो त्या तपासून पुन्हा विद्यार्थ्यांकडे पाठवतात. त्यांच्या वर्गात 34 विद्यार्थी आहेत. त्यांनी काही कृतिपत्रिका तयार केल्या. त्याला 12 विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. काही विद्यार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्रॉईड फोन नाही त्यांच्याशी त्या नियमित कॉलद्वारे बोलतात किंवा त्यांच्या शेजारी कुणाचा स्मार्टफोन असेल तर त्याचा उपयोग मुलांसाठी केला जातो.

वांद्रे पूर्व येथील पालिकेच्या शाळेच्या शिक्षिका पूजा संख्ये ज्यांना गेल्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता त्या मुलांसाठी अनोखा उपक्रम राबवतात. अमेझॉन अलेक्साशी बोलून मुलांना जे काही अनुभव येतात ते अनुभव शेअर केले जातात. त्याचबरोबर मुलांना वैयक्‍तिकरीत्या काही उपक्रम करण्यास त्या भाग पाडतात. त्यामध्ये चित्रकला, प्राणायामसाठी वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आदींचा समावेश आहे. पालिकेच्या शाळेत शिकणारी बहुतांशी मुले मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहात असल्याने त्यांना सातत्याने घरात बसणे अशक्य असते. त्याही स्थितीत त्यांना घरातच कसे गुंतवून ठेवता येईल यासाठी असे उपक्रम आम्ही आखले आहेत, असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर आम्ही दिवसभरात काय केले हे पालकांना इंग्रजीमधून सांगा हा वेगळा उपक्रम मुलांसाठी आम्ही राबवत आहोत. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

दहिसर पूर्वेकडील शाळेत चौथीच्या वर्गात 41 पैकी 32 विद्यार्थ्यांची सर्व विषयांची ऑनलाईन चाचणी घेण्यात आली. त्यासाठी सामान्य ज्ञान विषयाचे गुगल फॉर्म तयार करण्यात आले, असे शिक्षिका माधवी परुळकर यांनी सांगितले.