Mon, Jun 24, 2019 16:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेवणाची ऑर्डर देत हॉटेलच्या पेटीएम खात्यातून 42 हजार लंपास

जेवणाची ऑर्डर देत हॉटेल मालकाची लूट

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 13 2018 9:30AMमुंबई : अवधूत खराडे

ऑनलाईन आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून नागरिकांना लुटण्यासाठी ठग नवनवीन क्‍लुप्त्या शोधत असून एका ठगाने तीन पनीर मटर, 15 बटर रोटी, तीन जिरा राईस आणि दोन बुंदी रायता अशी जेवणाची मोठी आर्डर देत, त्याचे बील पेमेंट पेटीएमच्या माध्यमातून करण्याच्या बहाण्याने हॉटेलच्या पेटीएम खात्यातील 41,932 रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत समतानगर पोलीसांनी तपास सुरु केला आहे.

कांदिवली पुर्वेकडील पश्‍चिम द्रुतगती महामार्गालगत हॉटेल अ‍ॅव्हेन्यू नावाचे बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट आहे. या हॉटेलमध्ये विरल शेट्टी आणि दिपक पुजारी हे व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हॉटेलच्या लँन्डलाई फोनवर तिवारी नावाच्या व्यक्तिने फोन केला. पुजारी यांनी हा फोन रिसीव्ह केल्यानंतर तिवारीने त्यांना तीन पनीर मटर, 15 बटर रोटी, तीन जिरा राईस आणि दोन बुंदी रायता अशी जेवणाची ऑर्डर देत, बील किती झाले अशी विचारणा केली. पुजारी यांनी 2,111 रुपये बील झाल्याचे सांगितले.

थोड्यावेळात मी ऑर्डर नेण्यासाठी येत आहे. मात्र बील पेमेंट पेटीएममार्फत करायचे आहे असे तिवारीने पुजारी यांना सांगत फोन ठेवला. काही मिनिटांत त्याने पुन्हा फोन करुन हॉटेलचे पेटीएम अ‍ॅप असलेला मोबाईल नंबर मागितला. शेट्टी यांनी त्याला हा नंबर दिला. काही वेळाने तिवारीने पेटीएम अ‍ॅप असलेल्या मोबाईलवर फोन करुन आलेला ओटीपी क्रमांक मागितला. शेट्टी यांनी ओटीपी त्याला सांगत फोन ठेवला. दुसर्‍याच मिनिटाला तिवारीने पुन्हा याच पेटीएम मोबाईलवर फोन करुन ऑनलाईन व्यवहारात अडथळा येत असल्याचे सांगून पुन्हा आलेला ओटीपी नंबर मागितला.

मोबाईलमध्ये आलेला दुसरा ओटीपी पुजारी यांनी सांगितल्यानंतर याच मोबाईलवर आणखी काही मॅसेज आल्याचे त्यांना दिसले. पुजारी यांनी हे मॅसेज ओपन करुन बघितले असता त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. जेवणाची ऑर्डर देत, पेटीएमद्वारे बील चुकते करणार्‍या व्यक्तीने हॉटेलच्या पेटीएम खात्यातून 14.42 वा. 25 हजार आणि पुढच्याच मिनिटाला 16 हजार आणि 135 अशा तीन व्यवहारात तब्बल 41,935 रुपये लंपास केले होते. तिवारी आपल्याला गंडा घालत असल्याचे लक्षात येताच शेट्टी यांनी पेटीएम कस्टमर केअरला फोन करुन याची माहिती   दिली.

तिवारी फोन करत असलेल्या मोबाईलवर पुजारी व शेट्टी यांनी वारंवार फोन केले. मात्र हा नंबर बंद करण्यात आल्याने शेट्टी यांनी समतानगर पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठगाने ड्रीम 11 डॉट कॉमच्या माध्यमातून हे पैसे ऑनलाईन वळते केले असून त्याआधारे तसेच त्याने फोन केलेल्या मोबाईल अशा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.