Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ऑनलाईन गंडा घालणारी टोळी गजाआड 

ऑनलाईन गंडा घालणारी टोळी गजाआड 

Published On: Jun 13 2018 1:49AM | Last Updated: Jun 13 2018 1:17AMधारावी : वार्ताहर

रिलायन्स कॅपिटलमधून कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने मोहन महादेव कोरगावकर यांना 93 लाख रुपयांंचा गंडा घालणार्‍या टोळीला माटुंगा पोलिसांनी दिल्लीतून 6 जून रोजी अटक केली. राजेंदर सिंग (34), सचिन सिरोही (28), अनुपकुमार अग्रहारी(25), विक्रांत सिंग (26), प्रशांत चौधरी (25) अशी त्यांची नावे असून ते दिल्लीतील रहिवासी आहेत.  आरोपींकडून 20 मोबाईल फोन, सीपीयू, 2 राऊटर  जप्त करण्यात आले. 

या टोळीचा म्होरक्या राजेंदर सिंग याने रिलायन्स कॅपिटलच्या कार्यालयातून अमन माथूर बोलत असल्याचे सांगत मे 2018 रोजी मोहन कोरगावकर यांच्याशी फोनवरून संवाद साधला. वेगवेगळी कारणे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 16 वेगवेगळ्या बँक खात्यांवर 93 लाख रुपये भरण्यास सांगितले. कोरगावकर यांनी याबाबत रिलायन्स कॅपिटलकडे विचारणा केली असता आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

त्यांनी तात्काळ माटुंगा पोलीस ठाण्यात अज्ञात टोळीविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस उपायुक्त एन.अंबिका यांनी गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब काकड यांना दिले. काकड यांनी पोलीस निरीक्षक सरला वसावे, पोलीस उपनिरीक्षक मारुती शेळके, पोलीस शिपाई संतोष पवार, विकास मोरे यांचे पथक बनवून गुन्ह्याचा तपास सुरू केला. या तपासात पोलिसांनी सर्व आरोपींना दिल्लीतून अटक केली. या टोळीने आजपर्यंत शंभर लोकांना फसवल्याची कबुली प्राथमिक तपासात दिल्याचे पोलीस उपयुक्त एन. अंबिका यांनी सांगितले.