Tue, Aug 20, 2019 16:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईलवर ऑनलाईन तीनपत्ती जुगार जोरात

मोबाईलवर ऑनलाईन तीनपत्ती जुगार जोरात

Published On: Apr 22 2019 1:53AM | Last Updated: Apr 22 2019 1:44AM
ठाणे : प्रतिनिधी

मोबाईल फोनवर ऑनलाईन ऑक्ट्रो तीन पत्ती नावाचा जुगार गेम कॉइन लावून बेकायदा खेळणार्‍या व या गेमसाठी ऑनलाइन कॉइनची विक्री करणार्‍या टोळ्या ठाण्यात कार्यरत आहेत.हा जुगार सध्या तरुणांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. हा ऑनलाईन जुगार चालवणार्‍या टोळ्या कॉइनची विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा जमवत आहेत. तर या जुगारावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या मोबाईल मध्ये ऑनलाइन पद्धतीने विविध गेम उपलब्ध असून या गेमकडे तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. त्यात काही गेम आधुनिक पद्धतीचे जुगार देखील आहेत. त्यात ऑक्ट्रो तीन पत्तीचा समावेश आहे. प्ले स्टोर मधून गेम डाउनलोड केल्यानंतर त्यावर ऑनलाईन  जुगार खेळता येतो. याच गेमला ठाण्यातील काही मंडळींनी आपला धंदा बनवला असून चक्क या गेमचे जुगार अड्डे थाटले आहेत. हा गेम खेळून कॉइनची कमाई करता येते. जुगार अड्डे थाटून बसलेली मंडळी मोबाईल फोनवर ऑक्ट्रो तीन पत्ती नावाचा जुगार खेळून गेम कॉइनची कमाई करतात. त्यानंतर हेच कॉइन गेम खेळणार्‍या इतर लोकांना विकून त्यातून पैसे कमवतात. हा गेम मोठया प्रमाणात खेळणारी तरुणाई त्यांच्याकडे कॉइन संपले की ऑनलाइन जुगार अड्डे थाटून बसलेल्या लोकांशी ऑनलाईन संपर्क साधतात व हे कॉइन खरेदी करतात. दरम्यान, जुगार अड्डे थाटून बसलेल्या मंडळींचे व्हॉट्सऍप आणि फेसबुकवर हजारोच्या संख्येने ग्राहक असतात. ज्यांना कॉइन हवे असतील अशा लोकांशी संपर्क साधून 1 लाख कॉइन करिता 12 रुपये या दराने ही टोळी आपले कॉइन विक्री करतात. कॉइन विक्री केल्यानंतर हा सारा आर्थिक व्यवहार पेटीयम द्वारे अथवा इतर ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होतो. ठाण्यातील मुंब्रा, दिवा, वर्तकनगर, कोपरी, वागळे स्टेट, लोकमान्य नगर आदी भागात अशा प्रकारचे ऑनलाइन जुगार अड्डे मोठया प्रमाणात सध्या सुरू आहेत.

विशेष म्हणजे या गेम मधून दिवसाला लाखोंची उलाढाल होत असूनही मुंब्रातील एक जुगार अड्डा वगळता इतर एकाही जुगार अड्ड्यावर अद्याप पोलीस कारवाई झालेली नाही. या जुगार अड्ड्यावाल्यांचे स्थानिक पोलिसांसोबत सेटिंग असल्यानेच कारवाई होत नसल्याचे जोरदार चर्चा आहे. 

मुंब्रात झाली आहे कारवाई

ऑनलाईन मोबाईल फोनवर ऑक्ट्रो तीन पत्ती नावाचा जुगार खेळून गेम कॉइनची कमाई करणार्‍या पाच जणांच्या टोळीवर ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे कारवाई केली होती. मुंब्रा मधील एका इमारतीत हा बेकायदेशीर प्रकार सुरू होता. या टोळीकडून 2 लाख 86 हजार रुपये किमतीचे 56 मोबाईल फोन, 6 राऊटर्स, 5 आडोप्टर्स, 17 मोबाईल चार्जर व डेबिट कार्ड असा ऐवज पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.