Wed, Apr 24, 2019 22:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकतर्फी प्रेमातून बँक अधिकारी महिलेस खंडणीसाठी धमकी 

एकतर्फी प्रेमातून बँक अधिकारी महिलेस खंडणीसाठी धमकी 

Published On: Jun 12 2018 1:57AM | Last Updated: Jun 12 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

दहिसर येथे राहणार्‍या एका बँक अधिकारी महिलेला खंडणीसाठी धमकी देणार्‍या तिच्याच बँकेच्या सहकार्‍याला सोमवारी कुठलाही पुरावा नसताना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी शिताफीने अटक केली.
अभिजीत बच्चेलाल सिंग असे या आरोपी कर्मचार्‍याचे नाव असून लग्नासह प्रेमाचे प्रपोजल धुडकावून लावले म्हणून या महिलेला धडा शिकविण्यासाठी त्याने खंडणीसाठी धमकी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तिच्यासह तिच्या आईवर अ‍ॅसिड हल्ला, गोळ्या झाडून हत्या करण्याची तसेच तिचे अश्‍लील फोटो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे एपीआय अतुल आव्हाड यांनी सांगितले. 

अटकेनंतर अभिजीतला पुढील चौकशीसाठी दहिसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. एका खासगी बँकेत वरिष्ठ पदावर काम करणारी तक्रारदार महिला ही तिच्या आईसोबत दहिसर परिसरात राहते. जानेवारी महिन्यांत तिला एका अज्ञात व्यक्तीने एक पत्र पाठविले होते, त्यात या व्यक्तीने दहा दिवसांत पंधरा लाख रुपयांची व्यवस्था कर नाहीतर तुझ्यासह तुझ्या आईला गोळ्या झाडून ठार मारू, अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर तिला सतत घरी आणि बँकेत या अज्ञात व्यक्तीकडून खंडणीचे, धमकीचे पत्र येत होते.

प्रत्येक पत्रात अज्ञात व्यक्ती तिला वेगवेगळी धमकी देत होता. तिच्यासह तिच्या आईच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड हल्ला करू, तसेच तिचे काही अश्‍लील फोटो त्याच्याकडे असून ते सर्व फोटो इंटरनेटवर अपलोड करू अशी धमकी देत होता. पत्रातून तिच्यावर काहीच परिणाम होत नसल्याचे दिसून येताच त्याने तिला वेगवेगळ्या पीसीयूमधून कॉल करण्यास सुरुवात केली होती. 28 मे ते 9 जून या कालावधीत त्याने अनेकदा तिला पीसीयूमधून कॉल करून खंडणीसाठी धमकी दिली होती. 

या धमक्यांना कंटाळून अखेर तिने दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद होताच दहिसर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी समांतर तपास सुरू केला होता. तपासात ही धमकी तिच्याच परिचित व्यक्तीने दिली असावी, तिच्याविषयी खंडणीखोराला सर्व माहिती होती, प्रत्येक वेळेस तो ती सध्या कुठे आहे, दिवसभरात काय करते याची माहिती सांगत होता. 

त्यामुळे पोलीस उपायुक्त निसार तांबोली यांच्या पथकातील सुनील जाधव, अतुल आव्हाड, मंगेश तावडे, संतोष गायकर, सचिन सावंत, आव्हाड यांनी तक्रारदार महिलेच्या परिचित सर्व व्यक्तींची चौकशी सुरू केली होती. 

या चौकशीत अभिजीत हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अभिजीतला पोलिसांनी ताब्यात घेऊन थर्ड डिग्रीची धमकी देताच त्याने हा गुन्हा कबूल केला. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते, मात्र ती त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे तिला मानसिक त्रास व्हावा या उद्देशाने त्याने तिच्यावर पंधरा लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. या कबुलीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी दहिसर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.