Tue, May 21, 2019 12:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीतील टोळीयुद्धात एक ठार, तीन गंभीर जखमी

डोंबिवलीतील टोळीयुद्धात एक ठार, तीन गंभीर जखमी

Published On: Jul 30 2018 1:39AM | Last Updated: Jul 30 2018 1:35AMडोंबिवली : बजरंग वाळुंज

प्ले-बॉयचा जॉब देण्याची ऑफर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविल्याच्या रागातून पवार आणि जोशी टोळीत सशस्त्र राडा होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास पश्चिम डोंबिवलीत घडली. कुंदन जनक जोशी (32) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो पश्चिमेच्या जुनी डोंबिवली (सखाराम नगर) भागात राहात होता. या हल्ल्यात तीन जण जबर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

तीन दिवसांपूर्वी जोशी टोळीतील सौरभ मोहिते याने पवार टोळीतील अशोक सिंग याला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मेसेज पाठविला होता. प्ले-बॉयमध्ये सर्व्हिस दिल्यास एका वेळचे 25 हजार रुपये मिळतील. ओळखपत्रासाठी 1 हजार रुपये भरावे लागतील, असा मेसेज सौरभने अशोकच्या मोबाईलवर पाठविला. अशोकने हा प्रकार सिद्धार्थ नगरातील नंदू पवार याच्या कानावर घातला. आपल्या भागातील तरुणांना असले वाईट मेसेज पाठवतो म्हणून नंदू संतापला होता. त्यातच मेसेज पाठविणार्‍या सौरभने फोन करून बोलावल्याने शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास अशोक सिंग, नंदू पवार, गणेश पवार, युसूफ खान, निरव दुबे, हर्ष सोळंकी व इतर काही जण जुन्या डोंबिवलीतील सखाराम नगरमध्ये सौरभला भेटले. 

तेथे सौरभसह त्याचे मित्र मयूर सुर्वे आणि रोहित जोशी हे देखील होते. नंदू आणि मयूर या दोघांचे बोलणे सुरू असतानाच व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेल्या मेसेजवरून वाद उफाळला. त्यातच पवार टोळीतील युसूफ खान याने मयूर सुर्वे याला लाथ मारली. त्यानंतर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केला. हे प्रकरण निवळत असतानाच दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पवार-जोशी गटातला वाद पुन्हा उफाळून आला. पवार गटातील नंदू पवारसह त्याचे साथीदार अशोक सिंग, महेश पवार, युसूफ खान, नीरज दुबे, हर्ष सोळंकी, रोहन म्हात्रे व इतर 4 अशा 11 जणांची टोळी लाठ्या-काठ्या, चॉपर, तलवारी यासारख्या शस्त्रांसह जुन्या डोंबिवलीतील सखाराम नगरात घुसले.

त्यांनी जोशी टोळीतील तरुणांवर सशस्त्र हल्ला चढविला. या हल्ल्यात कुंदन जोशी हा तरुण घायाळ झाला. आपल्या लहान भावावर हल्ला होत असल्याचे पाहताच कुंदनचा मोठा भाऊ मुकेश हा हल्लेखोरांवर धावून गेला. हल्लेखोरांनी मुकेशवरही वार केले. तर जोशी टोळीनेही पवार टोळीवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पवार टोळीचा म्होरक्या नंदू पवार हा जबर जखमी झाला. त्यातच या हल्ल्यात घायाळ झालेल्या कुंदन आणि मुकेशला  परिसरातील लोकांनी उचलून रुग्णालयात दाखल केले. मात्र कुंदनचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.