होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दीड वर्षात ठाणेकरांसाठी नवे स्थानक

दीड वर्षात ठाणेकरांसाठी नवे स्थानक

Published On: Mar 25 2018 2:17AM | Last Updated: Mar 25 2018 2:17AMठाणे : पुढारी वृत्तसेवा  

गेल्या 14 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशनच्या उभारणीसाठी 14 एप्रिलपर्यंत जागा हस्तांतरित होणार असून त्यानंतर तात्काळ निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल आणि साधारणतः वर्ष, दीडवर्षात ठाणेकरांच्या सेवेत नवे कोरे स्मार्ट रेल्वेस्थानक उभे राहिलेले असेल, अशी माहिती  अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी पुढारीला दिली.

 स्टेशनपर्यंत जाण्यासाठी तीन मार्गिकांबरोबरच, पार्किंग, बस टर्मिनस अशा सुविधा या नवीन रेल्वे स्थानकामध्ये निर्माण करण्यात येणार असून 289 कोटींच्या या प्रकल्पामुळे  ठाणे स्थानकाचा 23 टक्के तर मुलुंड रेल्वे स्थानकाचा 14 टक्के भार कमी होणार आहे. दोन भागांमध्ये या स्थानकांचे काम करण्यात येणार आहे. पहिल्या भागात सिग्नल यंत्रणा, प्लॅटफॉर्म, विद्युत कामे आणि एफोबीची कामे करण्यात येणार आहे. तर दुसर्‍या भागात स्टेशन परिसराचा विकास केला जाणार आहे. महापालिका रेल्वे स्थानक परिसराचा विकास हा स्मार्ट सिटी योजनेमधून करणार असल्याचे  चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. 

ठाणे  रेल्वे स्थानकावर वाढता ताण लक्षात घेऊन 2004  वर्षांपूर्वीच नवीन रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव पुढे आला होता. मनोरुग्णालयाच्या जागेत हे स्थानक उभारण्याचे पालिकेने निश्चित केले.   त्यानुसार ठाणे - मुंलूंड स्थानकादरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित स्थानक उभारण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. महापालिकेने तज्ज्ञ सल्लागारांमार्फत केलेल्या सर्वेक्षणानंतर  सल्लागारांनी विस्तारित स्थानक उभारणीचा आराखडा महापालिकेला सादर केला आहे. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर आता केवळ आरोग्य विभागाकडून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया राहिली आहे. ती 14 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल.  त्यानंतर लगेचच निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे  चव्हाण म्हणाले. रेल्वेची परवानगी यापूर्वीच मिळाली असल्याने आता केवळ जागेबाबत राज्य शासनाची परवानगी बाकी आहे. या कामासाठी दोन वर्षाचा कालावधी लागणार असून 2019 पर्यंत किंवा 2020 च्या सुरुवातीपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचा दावा देखील चव्हाण यांनी केला.

Tags : mumbai, mumbai news, new station, extended station,  Thane,