Wed, Aug 21, 2019 15:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयाच्या दारात तरुणाच्या हाती कीटकनाशक

मंत्रालयाच्या दारात तरुणाच्या हाती कीटकनाशक

Published On: Feb 03 2018 2:18AM | Last Updated: Feb 03 2018 2:18AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या शेतकर्‍याने जमीनीचा मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आपले जीवनयात्रा संपवल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील तरुणाकडे प्रवेशद्वारावरील तपासणी दरम्यान कीटकनाशकाची बाटली आढळल्याने खळबळ उडाली. 

अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचे आव्हान मंत्रालय सुरक्षा यंत्रणेपुढे उभे राहीले आहे. 

औष्णिक वीज प्रकल्पातील जमीनीला योग्य मोबदला न मिळाल्याने धुळे जिल्ह्यातील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन केले. त्यात त्यांचे निधन झाले. ही घटना ताजी असताना आज अशा आणखी एका घटनेची पुनरावृत्ती टळली. सोलापूर जिल्ह्यातील सांगली येथील मारूती सदाशिव धावरे वय (28 वर्षे)या तरूण शेतक-याची पोलीसांनी मंत्रालयात प्रवेशव्दारावर तपासणी केली असता त्याच्याकडे कीटकनाशकाची बाटली आढळून आली. त्यामुळे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शेतातील ऊस घेवून जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतातील उभे पीक जाळावे लागले. मात्र सरकारी यंत्रणेकडे दाद मागूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या शेतकर्‍याने धर्मा पाटील यांचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक पिडीतांनी न्यायासाठी गृह विभागाकडे निवेदन देताना आत्महत्येचा इशारा दिल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही एकाचवेळी तिघांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तपासणीत काही दिवसांपूर्वीच कीटकनाशकही सापडले होते.