Wed, Mar 20, 2019 09:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील पहिली मुलींची मराठी शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर

मुंबईतील पहिली मुलींची मराठी शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर

Published On: Jun 12 2018 1:57AM | Last Updated: Jun 12 2018 1:42AMमुंबई : संजय गडदे

मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांनी सुरू केलेली मुंबईतली मराठी माध्यमाची पहिली मुलींची शाळा यंदाच्या पावसाळ्यात पडण्याची भीती आहे. नाना शंकरशेट यांनी गिरगावातल्या ठाकूरद्वारजवळ 1849 साली म्हणजेच 169 वर्षांपूर्वी ही मुलींची पहिली मराठी माध्यमाची शाळा स्वत:च्या वाड्यात सुरु केली. मुलींची पहिली मराठी शाळा अशी ओळख असणारी ही शाळा मात्र आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने या शाळेच्या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून घोषित केले आहे. तेव्हापासून ही शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे, मात्र मुंबई महापालिकेनेही या शाळेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे समजते. 

1962मध्ये मुंबई महापालिकेने ही वास्तू आणि शेजारचे मैदान ताब्यात घेतले. मात्र गिरगावातील ठाकूरद्वार परिसरात नाना शंकरशेट यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीतर्फे ही शाळा चालवली जात आहे. शाळेची इमारत महापालिकेच्या ताब्यात असल्याने तिच्या दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची होती. पण महापालिकेने मोडकळीला आलेल्या या इमारतीची दुरुस्ती केली नाही. 1996 मध्ये शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रमोद नवलकर यांच्या निधीतून या शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र नंतरच्या  काळात संबंधित संस्थेने महापालिकेकडे दुरुस्तीची परवानगी मागितली. मात्र दुरुस्तीसाठी महापालिकेने एकदाही संस्थेला परवानगी दिली नाही. परिणामी शाळा सध्या मोडकळीस आली असून कधीही कोसळ्याची भिती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

शाळेतल्या मुलींना खेळण्यासाठी शाळेच्या जवळच मैदानही आहे. पण महापालिकेने  शाळा आणि मैदानाच्या मध्ये भिंत घातली आहे. त्यामुळे मैदानाच्या जागेत बाग तयार करून त्याचा फायदा शेजारी होत असलेल्या बिल्डरांच्या प्रकल्पासाठी कसा होईल? याचे नियोजन केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्याची मागणीही सातत्याने केली जात आहे. तसेच त्यांचे स्मारकही निधीअभावी रखडले आहे. त्यातच आता त्यांनी सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचे अस्तित्व पुसले जात असताना कुणीच याकडे लक्ष देत नाही. दरम्यान या प्रकरणाबाबत सी विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त उदय शिरूरकर यांनी या वास्तूचे जतन करण्याबाबत शिक्षण विभागाशी सल्लामसलत करून निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.