होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओमकार बिल्डरला अटक करा

ओमकार बिल्डरला अटक करा

Published On: Feb 02 2018 1:44AM | Last Updated: Feb 02 2018 1:33AMमालाड : निसार अली

‘माझ्या मुलीला दहावीच्या परीक्षेला मुकावे लागले. आम्ही रस्त्यावर आल्यामुळे तीला शिक्षण सोडावे लागले. हे पाप हा विकासक कुठे फेडणार ? माझे पती आजारी पडले. माझ्या पायाची नस दबली गेली. लग्नाच्या दहाव्या वर्षी मुलगी झाली, तिला एकटीला घरी सोडून रस्त्यावर राहण्यास भाग पडत आहे. आता तरी हे निष्ठूर सरकार जागे होणार की विकासक ओमकार बिल्डरला पाठीशी घालणार, असा उद्वेग मालाडच्या जानू भोईर गृहनिर्माण संस्थेतील बेघर झालेल्या कांताबेन पटेल यांनी व्यक्त केला. या विकासकाला तातडीने अटक करा, अशी मागणी या संस्थेतील रहिवाशांनी केली.

बिल्डरकडून न्याय मिळत नसल्याने गेल्या 625 दिवसापासून येथील रहिवाशी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत. गुरुवारी काही रहिवाशी दाद मागण्यासाठी मंत्रालयात गेले तर काहींनी आपले उपोषण सुरूच ठेवले. दैनिक ‘पुढारी’कडे आपली कैफियत मांडतांना त्यांना अश्रू अनावर झाले. कांतिबेन पटेल तर अगदी लहान मुलासारख्या रडत होत्या. 

‘हे कसलं राज्य आहे, जिथं गरीब रस्त्यावर आणि श्रीमंत बंगल्यावर. आमच्या हक्काची घरे तोडून कसला विकास करताय जणांची नाही तर मनाची लाज असेल तर विकासकाला त्वरित अटक करून आम्हाला आमच्या हक्‍काची घर द्यावीत’, असा आक्रोश उपोषणकर्ता गोविंद अहिर यांनी व्यक्त केला. 

तर ‘मी मराठी आहे. मराठी माणसाच्या नावाच्या पोळ्या भाजणारे नेते व सरकारमधील त्यांचे पार्टनर आमच्याकडे का लक्ष देत नाही’, असा सवाल उपोषणकर्ता गजानन माळी यांनी उपस्थित केला.मराठी माणसाची फक्त मतं हवीत. आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळवून द्यावे अन्यथा हे पाप तुमच्या येणार्‍या पिड्यांना भोगावे लागणार, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

उपोषणकर्ते हिम्मत भाई जेठवा म्हणाले, ‘आमच्यावर अशी वेळ आणणार्‍या विकासकाला मदत करणार्‍यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले पाहिजे. आम्हाला रस्त्यावर आणणार्‍या विकासकाने आमची हक्काची घरं दिली नाहीत तर आम्ही त्याच्या घरात घुसून राहू, हे त्यांनी लक्षात घ्यावे. कारण आमच्या कडे आता करो या मरो शिवाय दुसरा मार्ग शिल्लक नाही’.