Wed, Aug 21, 2019 02:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्ट बसमध्ये पुन्हा जुनी तिकिटे

बेस्ट बसमध्ये पुन्हा जुनी तिकिटे

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:32AM

बुकमार्क करा
मुंबई  : प्रतिनिधी 

बेस्ट बसमध्ये तिकीट देण्यासाठी उपलब्ध असलेल्या 30 टक्के ट्रायमॅक्स मशीन्स खराब झाल्या आहेत. त्यामुळे  उपक्रमाने पुन्हा जुन्या पद्धतीने प्रवाशांना  तिकीट देण्यास सुरू केले आहे. यासाठी  1 कोटी 71 लाख रुपये खर्च येणार आहे. या तिकिटांमुळे बसप्रवाशांची अडचण दूर होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

बेस्टची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना मेट्रोच्या कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे बससेवेवर परिणाम झाला आहे. अशातच, गेल्या काही महिन्यांपासून कंडक्टर वर्गास देण्यात आलेल्या ट्रायमॅक्स इलेक्ट्रॉनिक मशीन्समध्ये बिघाड असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यामुळे दैनंदिन बसवाहतुकीस झळ बसत आहे. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने जुन्या पद्धतीप्रमाणचे तिकीट पुरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. जास्त रक्कमेच्या तिकिटांचा पुरवठा करण्यासाठी यापूर्वी सुमारे 23 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यानंतर तिकिटांची होणारी कमतरता लक्षात घेत अधिक प्रमाणात तिकिटांची छपाई करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 

उपक्रमाने त्यासाठी 1 कोटी 71 लाख 36 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.  यावर मंगळवारी बेस्ट समिती बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी ट्रायमॅक्स मशीन्स बिघडल्याने ही परिस्थिती ओढवल्याची टिका केली. भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी यासंदर्भात पुढील बैठकीत चर्चा करण्याची सूचना केली. त्यावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही या संदर्भात पुरेशी आणि सविस्तर चर्चा आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार पुढील बैठकीत त्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.