Mon, Aug 19, 2019 17:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या जुन्या लोकल होणार हद्दपार

मुंबईच्या जुन्या लोकल होणार हद्दपार

Published On: Mar 06 2018 1:50AM | Last Updated: Mar 06 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या तीनही मार्गांवर दिवसभरात रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. या सर्वांना हवेशीर, प्रशस्त आणि ऐसपैस जागा उपलब्ध करून देणार्‍या बम्बार्डिअरने मुंबईच्या रेल्वे ट्रॅकवर ताबा मिळवला आहे. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून इमानइतबारे मुंबईच्या तोबा गर्दीला वाहून नेणार्‍या जुन्या लोकल लवकरच हद्दपार होणार आहेत. आधुनिक बम्बार्डिअर लोकल आल्यामुळे जुन्या लोकल न वापरण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कधी आवश्यकता लागली तरच या लोकल वापरण्यात येतील, असे सांगण्यात आले.

मुंबईतील भेल कंपनीच्या सर्व जुन्या लोकल ट्रेन मुंबई रेल्वेच्या सेवेतून बाद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. आधुनिक बम्बार्डिअर लोकल प्रवाशांच्या पसंतीस पडल्याने त्यांची मागणी वाढली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

18 वर्षांचा ऋणानुबंध संपणार?

मागील 18 वर्षांपासून मुंबईकरांचा सुखकर प्रवास ज्या लोकल डब्यातून होत असे, ते सर्व डबे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (इकएङ) या इंजिनीअरिंग आणि  मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनीच्या काही लोकल मुंबईत धावत होत्या. 12 डब्यांच्या एकूण 8 भेल लोकलस मध्य रेल्वेवर प्रवासी वाहतूक करत होत्या. 2000 सालापासून या लोकल मुंबईकरांच्या सेवेत होत्या, पण आधुनिक बम्बार्डिअर आल्यामुळे जुन्या लोकल न वापरण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कधी अचानक गरज पडली तरच जुन्या लोकल वापरण्यात येतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.

का घेण्यात आला निर्णय?

सतत होणारे तांत्रिक बिघाड, पावसाळ्यात बंद पडणार्‍या लोकल आणि आगीच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही म्हटले आहे. रेल्वे सेफ्टी बोर्डाने 2014 मध्येच या लोकल बंद करण्याचे आदेश दिले होते. पण, नवीन लोकल उपलब्ध नसल्याने या लोकलचा वापर केला जात होता. पण, पश्‍चिम रेल्वेने दोन बम्बार्डिअर मध्य रेल्वेला दिल्या व आता मध्य रेल्वेने स्वत:च्या बम्बार्डिअर खरेदी केल्या असल्याने मध्य रेल्वेवर बम्बार्डिअर धावू लागल्या आहेत. त्यामुळे जुन्या लोकलची सेवा बंद करण्याचा निर्णय झाला.