Sat, Jul 20, 2019 13:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओला- उबर चालकांच्या संपाला हिंसक वळण! 

ओला- उबर चालकांच्या संपाला हिंसक वळण! 

Published On: Mar 20 2018 2:13AM | Last Updated: Mar 20 2018 2:13AMमुंबई : वार्ताहर

विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या ओला-उबर चालकांच्या संपाला सोमवारी हिंसक वळण लागले. चेंबूर, कुर्ला एव्हरेस्ट कॉलनी, सायन, अंधेरी, वडाळा, चुनाभट्टी भागात बंदमध्ये सहभागी न झालेल्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. 

याप्रकरणी मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर, सचिन बाबर, राजेंद्र गावकर यांच्यासह 9 जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, या बंदला मुंबई व नवी मुंबई परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला असून मागण्या मान्य होईपर्यंत बंद केला जाणार असल्याची माहिती मनसे वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. मंगळवारी दुपारी 12 वाजता चालकांची कंपन्यांसोबत बैठक होणार असून, त्यानंतर संपाची पुढील दिशा ठरणार आहे. 

ओला आणि उबरचे चालक रविवारच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.  या चालकांनी 5 ते 7 लाख रुपये गुंतवले आहेत. त्यांना सव्वा लाख रुपये प्रति महिना मिळतील, असे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र यातील अर्धी रक्‍कमही त्यांच्या पदरात पडत नाही. त्यातच कंपन्यांकडून त्यांच्या मालकीच्या वाहनांना प्राधान्य देण्यात येते. त्याचा परिणाम चालकांच्या उत्पन्नावर होत आहे, असा आरोप चालकांनी केला आहे. ओला, उबरची मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील तब्बल 45 हजार वाहने कार्यरत आहेत.पण सध्या या व्यवसायात 20 टक्के घट झाली आहे. त्यामुळे कर्ज काढून गाडी घेऊन काम करणार्‍या चालकांना त्याचा हप्ता देखील भरणे आता कठीण होऊन बसले. त्यामुळे त्यांच्या गाड्या बँकेकडून जप्त होत आहेत, असे काही चालकांनी सांगितले. मागण्या पूर्ण न झाल्यास संप बेमुदत लांबू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

काही जणांच्या जमावामुळे प्रवासी व वाहनचालकांना झालेल्या अडचणीबाबत उबर प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली. 

tags : Ola Uber, driver, strike, violent turn, mumbai news