Tue, Apr 23, 2019 23:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत ऑईलच्या गोदामाला भीषण आग

भिवंडीत ऑईलच्या गोदामाला भीषण आग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

भिवंडी : वार्ताहर 

भिवंडी तालुक्यातील गुंदवली ग्रामपंचायत हद्दीतील श्री गणेश कम्पाऊंड या गोदाम संकुलातील ऑईल व टायर गोदामास रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की, आगीच्या भक्ष्यस्थानी एक लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळातील तब्बल 12 गोदाम जाळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडीसह कल्याण, उल्हासनगर, ठाणे येथील अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तब्बल दहा तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी काही ठिकाणी ही आग धुमसतच असल्याची माहिती तहसीलदार गायकवाड यांनी दिली. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदामामधील कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले आहे. 

भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोदाम व्यवसाय फोफावलेला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून येथील गोदामांना आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच रविवारी रात्री 12 च्या सुमारास गुंदवली येथील श्री गणेश कम्पाऊंड या गोदाम संकुलात इजिलिटी वेअरहाऊसला भीषण आग लागली. या गोदामामध्ये गाड्यांचे ऑइल, बीएमडब्ल्यू गाड्यांचे टायर व इतर साहित्य तब्बल एक लाख स्क्वेअर फुटाच्या 12 गोदामांमध्ये  साठविले होते. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु आग मोठी असल्याने कल्याण, उल्हासनगर, ठाणे येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

ही आग संपूर्ण विझवण्यासाठी चोवीस तासाहून अधिक काळ लागणार असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी राजेश पवार यांनी दिली. आगीचे कारण अस्पष्ट असून, घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दहा तास उलटल्यानंतरही ही आग धुमसत असल्याने ही आग पूर्णपणे विझवण्यासाठी किमान अजून सहा तास लागतील अशी माहिती नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

Tags :Bhiwandi, Oil godown fire, mumbai news


  •