Tue, Jan 22, 2019 01:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई हाय परिसरात ओएनजीसीला आढळले तेल-वायूचे मोठे साठे!

गुड न्यूज: ONGCला आढळले तेल-वायूचे मोठे साठे!

Published On: Jan 02 2018 2:03AM | Last Updated: Jan 02 2018 2:03AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक चांगली बातमी सरकारी मालकीची असलेल्या ओएनजीसी अर्थात ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनकडून मिळाली आहे. या कंपनीला अरबी समुद्रातील मुंबई हाय परिसरात खनिज तेल आणि वायूचे मोठे साठे सापडले आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

डब्ल्यूओ-24-3 (डब्ल्यूओ-24-सी) या तेल विहिरीत हे साठे सापडल्याचे त्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. संसद सभागृहाला सुट्टी असल्यामुळे हे लेखी उत्तर लोकसभेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. उत्खननादरम्यान मिळालेल्या महितीनुसार 9 ठिकाणी खनिजे आढळली होती. विस्तृत चाचणी केल्यानंतर ते खनिज तेल आणि वायू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा आकार 29.74 दशलक्ष टन खनिज तेल आणि द्रवरूप वायू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

या साठ्यांमुळे 3 हजार 310 बॅरल प्रतिदिन खनिज तेल आणि 17,071 घनमीटर गॅस प्रतिदिन उपलब्ध होईल,  प्रधान यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. अनेक स्तरांत असलेल्या या साठ्यांमुळे नवे क्षेत्र उपलब्ध झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारताला कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. यासाठी विदेशी चलनही मोठ्या प्रमाणात खर्च होते. साहजिकच याचा परिणाम विदेशी गंगाजळीवर होतो. आयात आणि निर्यातीचा समतोल बिघडतो आणि रुपयाच्या दरावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. आता हे मोठे साठे सापडल्यामुळे कच्च्या तेलावर होणारा खर्च कमी होणार आहे. त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या आर्थिक स्थितीवर आणि रुपयावरही होणार आहे.