Thu, Apr 25, 2019 23:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील सहआयुक्तांसह काहींना दिलासा

मुंबईतील सहआयुक्तांसह काहींना दिलासा

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 12:56AMमुंबई : अवधूत खराडे

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या उच्चपदस्थ आयपीएस अधिकार्‍यांच्या गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बदल्या अखेर गृहमंत्रालयाने गेल्या शुक्रवारी आणि काही बदल्या सोमवारी केल्या. मात्र काही अधिकार्‍यांचा त्यांच्या पदावरील कार्यकाल पूर्ण झाला असतानाही त्यांना या बदल्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याने कही खुशी कही गम अशी स्थीती पोलीस दलात निर्माण झाली आहे.

सहा-सात महिन्यांत राज्य पोलीस सेवेतील काही बड्या अधिकार्‍यांना बढत्या मिळणार असल्याने त्यावेळीच उरलेल्या या बदल्या करण्याचा गृहमंत्रालयाचा मानस असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते. 

मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे प्रमुख पद भूषविल्यानंतर सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांची मे 2016 मध्ये राज्य दहशतवाद विरोधी विभागाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. कुलकर्णी हे एटीएसची धुरा चांगल्याप्रकारे सांभाळत असल्याने केंद्रातूनच त्यांना या ठिकाणी मुदत वाढ देण्याचे निर्देश राज्यसरकारला देण्यात आल्याचे समजते.

मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सहआयुक्त देवेन भारती 15 एप्रिल 2015 पासून सांभाळत आहेत. भारती यांच्या कार्यकालात राकेश मारीया, अहमद जावेद, दत्ता पडसलगीकर आणि सध्याचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल असे चार पोलीस आयुक्त बदलले गेले. मात्र भारती यांनाही राज्यशासनाने याच पदावर बढती दिल्याचे समजते.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांचाही कार्यकाल या महिन्यात पूर्ण झाला आहे. तर मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त निकेत कौशीक आणि नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांचाही येत्या ऑगस्ट महिन्यात कार्यकाल पूर्ण होत आहे. मात्र गृहमंत्रालयाने तुर्तास तरी त्यांच्या बदल्यांना स्थगिती दिल्याच्या चर्चा पोलीस दलात सुरु झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या 14 मार्चपासून रिक्त असलेल्या गुप्तचर विभागाची जबाबदारी संजय बर्वे सांभाळत असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पोलीस महासंचालक पद जुलै 2016 पासून रिक्त आहे. तसेच केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले सदानंद दाते हेसुद्धा पुढच्या वर्षी राज्य पोलीस दलात परतणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते. त्यामुळे बड्या अधिकार्‍यांच्या बढत्या देण्यासोबत गृहमंत्रालय त्यांच्या नवनियुक्त्या जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.