Fri, May 24, 2019 06:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना नगरसेवकांवर पदाधिकार्‍यांचाच हल्‍ला

सेना नगरसेवकांवर पदाधिकार्‍यांचाच हल्‍ला

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 1:03AMउल्हासनगर : वार्ताहर

उल्हासनगरमधील शिवसेना नगरसेवकावर पूर्ववैमनस्यातून शिवसेना पदाधिकार्‍यांसह 7 ते 8 जणांच्या टोळीने दगडफेक करून नंतर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. विकास पाटील असे या नगरसेवकाचे नाव असून, ते घराकडे जात असताना हा हल्ला झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास नगरसेवक विकास पाटील हे त्यांच्या हुंदाई वेरणा गाडीतून दोन मित्रांसह घरी परतत असताना काकोळा गावाजवळ अंबरनाथ शिवसेनेचे गणेश पाटील, उल्हासनगरचे शाखाप्रमुख जितू साळुंखे व त्यांच्या अन्य 7 ते 8 साथीदारांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. नंतर गाडीच्या काचा फोडून हल्लेखोरांनी विकास पाटील यांना शिवीगाळ व मारहाण केली.  या प्रकरणी गणेश पाटील, जितू साळुंखे आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक बैठकीतच जुंपली!

ठाणे : कोकण पदवीधर निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या पक्षीय बैठकीत उद्भवलेल्या वादातून शिवसेना शाखाप्रमुखावर हल्ला केल्याची घटना रविवारी सायं. पवारनगर परिसरात घडली. आत्माराम थोरात (49, रा.टिकुजीनी वाडी,मानपाडा) असे जखमीचे नाव असून ते माजी नगरसेवकदेखील आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी शिवसेना विभागप्रमुख जेरी डेव्हिड याच्यासह चार ते सहा हल्लेखोरांवर चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली. कोकण पदवीधर निवडणुकीनिमित्त शनिवारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक टेंभी नाक्यावरील सूर्या कार्यालयात आयोजित केली होती. त्यावेळी सेनेचे उमेदवार माजी महापौर संजय मोरे, शहरप्रमुख रमेश वैती, विभागप्रमुख जेरी डेव्हिड आदींसह थोरातसुद्धा उपस्थित होते.

तेव्हा बैठकीत जेरी डेव्हिड यांचा थोरात यांच्याशी वाद झाला असता डेव्हिड यांनी थोरात यांना तुला संध्याकाळपर्यंत संपवतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी रविवारी सायंकाळी थोरात घरातून उपवन परिसराकडे निघाले होते. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून तीन दुचाकीवरून आलेल्या चार ते सहा जणांच्या टोळक्याने अचानक त्यांच्या तोंडावर लाकडी दांड्याने फटका मारून त्यांना खाली पाडले व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने टोळके पसार झाले. हल्लेखोरांनी दुचाकीच्या नंबर प्लेटवर माती लावलेली होती.  हा हल्ला जेरी डेव्हिड यांच्याच सांगण्यावरून झाल्याची तक्रार आहे.