Thu, Apr 25, 2019 17:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जावसई ठाकूर पाड्यातील रहिवाशांना दूषित पाण्याची बाधा!

जावसई ठाकूर पाड्यातील रहिवाशांना दूषित पाण्याची बाधा!

Published On: May 16 2018 1:43AM | Last Updated: May 16 2018 1:12AMअंबरनाथ : प्रतिनिधी 

शहराच्या पश्‍चिम भागातील जावसई-ठाकूर पाडा येथील रहिवाशांना  दूषित पाण्याची बाधा झाल्याने उलटी, चक्‍कर, डोके दुखी असा त्रास होत आहे. वीसपेक्षा जास्त जणांना अंबरनाथ नगरपरिषदेच्या डॉ.बी.जी. छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, यामध्ये सर्वाधिक महिला, लहान मुले आहेत. या प्रकाराने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच औषधोपचराची कमतरता पडू न देण्याचे आदेश डॉक्टरांना दिले. एवढेच नाही तर ठाकूर पाड्यातील नागरिकांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा केला.  

जावसई -ठाकूर पाडा हा भाग अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये येतो. हा भाग प्रामुख्याने आदिवासी वस्ती असलेला भाग म्हणून ओळखला जातो. साधारण 400 लोकवस्तीचा हा भाग  नगरपरिषदेच्या हद्दीत असूनही या ठिकाणी अद्याप नळ योजना पोहचलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना विहीर आणि डवर्‍यातील पाणी उपसा करून आपली तहान भागवावी लागते. कडाक्याच्या उन्हामुळे विहीर, डवर्‍यांनी तळ गाठल्याने येथील रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून गाळ मिश्रीत दूषित पाणी पिऊनच गुजराण करावी लागत आहे. हेच दूषित पाणी प्यायल्याने मंगळवारी सकाळी अचानक येथील रहिवाशांना उलट्या हेाणे, चक्‍कर येणे, डोके दुखी असा त्रास होऊ लागला. 

या घटनेची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री गुप्‍ता यांनी बाधित रहिवाशांना नगरपरिषदेच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात पुढाकार घेतला. या घटनेची गंभीर दखल घेऊन नगराध्यक्षांनी तातडीने रुग्णांची भेट घेऊन विहिरीतील दूषित पाणी न पिण्याचे आवाहन करीत जावसई -ठाकूर पाडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने व्यवस्था केली आहे. आरोग्य सभापती रवींद्र पाटील, नगरसेवक सशांक गायकवाड, शाखा प्रमुख अरविंद मालुसरे, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री गुप्‍ता आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.