होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओएनजीसीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:24AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

जुहू विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर बेपत्ता झालेल्या ओएनजीसीच्या पवन हंसच्या हेलिकॉप्टरचा डहाणूजवळच्या समुद्रात कोसळून अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये ओएनजीसीचे 5 कर्मचारी आणि दोन पायलट होते. यापैकी चौघांचे मृतदेह आढळले आहेत. शनिवारी सकाळी 10 वाजून 14 मिनिटांनी त्यांनी या हेलिकॉप्टरने मुंबई हायच्या दिशेने उड्डाण केले होते. त्यानंतर सुमारे  साडेदहा वाजण्याच्या सुमारास या हेलिकॉप्टरचा शेवटचा संपर्क झाला होता. 

या हेलिकॉप्टरमधून जनरल मॅनेजर पंकज गर्ग, व्ही के.बिंदूलाल बाबू, आर. सरवानन, पी. एन. श्रीनिवासन,जॉस अँथोनी, पायलट कॅप्टन ओहोटकर आणि कॅप्टन कटोच हे प्रवास करत होते. मुंंबई हायच्या तेल केंद्राकडे हे हेलिकॉप्टर न पोहोचल्याने त्याची माहिती तटरक्षक दलाला देण्यात आली. त्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात आले. अडीच तासांनंतर या हेलिकॉप्टरचे अवशेष डहाणूजवळ सापडले. 

जुहू विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर नियमाप्रमाणे पायलटने त्यांचा रेडिओ संपर्क बदलला. त्यानंतर मुंबई हायच्या तेलकेंद्राशी 10 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास शेवटचा संपर्क झाला. सुमारे 9 किलोमीटरचे अंतर पार करत असताना हा संपर्क कायम होता. 10.30 नंतर तो पूर्णतः तुटला. त्यावेळी हे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनार्‍यापासून 50 किलोमीटरवर होते. 11 वाजण्याच्या सुमारास ते मुंबई हायच्या तेल केंद्रावर उतरणे अपेक्षित होते. पण पुढे त्याचा काही संपर्क झाला नाही. 

तटरक्षक दलाला  हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिमेसाठी या दलाचे जहाज घटनास्थळी रवाना झाले. साधारणपणे साडेबाराच्या सुमाराला तटरक्षक दलाच्या जवानांना हेलिकॉप्टरचा काही भाग आढळला. त्यानंतर हेलिकॉप्टरमधील सातपैकी चार जणांचे मृतदेहदेखील आढळले.