Thu, Apr 25, 2019 05:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओएनजीसी हेलिकॉप्टर दुर्घटनेतील सहा जणांचे मृतदेह मिळाले; एकाचा शोध सुरूच

ओएनजीसी हेलिकॉप्टर दुर्घटनेतील सहा जणांचे मृतदेह मिळाले; एकाचा शोध सुरूच

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:00AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ओएनजीसीच्या पवन हंसच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी दोनपैकी एका पायलटसह ओनजीसीचे पाचही अधिकारी असे एकूण सहा जणांचे मृतदेह सापडले असून बेपत्ता असलेल्या एका पायलटचा शोध सुरु आहे. 

पी.एन.श्रीनिवासन, आर.साराव्हनन, जोसे अँटोनी, पंकज गर्ग आदी ओएनजीसीचे अधिकारी व पायलट कॅप्टन आर.ओथकर आदींची ओळख पटली असून आणखी एका मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे ओएनजीसीच्या पत्रकात म्हटले आहे. 14 जानेवारी रोजी शोध आणि बचाव कार्य सुरु असताना दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा व्हीडीआर सापडला असून हेलिकॉप्टरचे इतर अवशेष मिळवण्यासाठी शोधकार्य सुरुच आहे.

जुहू विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर   बेपत्ता झालेल्या ओएनजीसीच्या पवन हंसच्या हेलिकॉप्टरचा शनिवारी डहाणूजवळच्या समुद्रात अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये ओएनजीसीचे 5 कर्मचारी व दोन पायलट होते. शनिवारी सकाळी 10.14 वाजता हेलिकॉप्टरने मुंबई हायच्या दिशेने उड्डाण केले होते. त्यानंतर साडे दहाच्या सुमारास हेलिकॉप्टरचा शेवटचा संपर्क झाला होता. मुंबई हायच्या तेल केंद्राकडे सदर हेलिकॉप्टर न पोहोचल्याने त्याची माहिती तटरक्षक दलाला देण्यात आली. त्यानंतर शोधकार्य सुरु होऊन तब्बल अडीच तासानंतर हेलिकॉप्टरचे अवशेष डहाणूजवळ सापडले.