Mon, Jun 24, 2019 17:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात आता रेशनिंग दुकानांची पोर्टेबिलिटी

महाराष्ट्रात आता रेशनिंग दुकानांची पोर्टेबिलिटी

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:42AMठाणे : दिलीप शिंदे

मोबाईल कंपन्यांप्रमाणेच आता शिधापत्रिकाधारकांनाही पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध झाली असून पात्र लाभार्थ्यांना शहरातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या हिश्श्याचे धान्य उचलण्याची मुभा मिळाली आहे. आधारक्रमांकावर आधारित संगणकीय धान्यवाटप योजनेंतर्गत पाच महिन्यांत राज्यातील रेशनिंग विभागनिहाय 42 जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू झाल्याने आजपर्यंत 6 लाख 7 हजार 102  लाभार्थ्यांनी पोर्टेबिलिटीचा फायदा घेऊन धान्य मिळविले आहे. 

राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून गरिबांसाठी सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानांतून धान्य उपलब्ध करून दिले जाते. यासाठी राज्यात 52 हजार 297  दुकाने असून त्यापैकी 21 हजार 887 दुकाने सक्रिय आहेत. शिधापत्रिकाधारकांना ठरवून दिलेल्या दुकानातूनच आतापर्यंत धान्याची उचल करावी लागत होती. संपूर्ण धान्य वितरण प्रणालीचे संगणकीकरण झाल्यानंतर आधारक्रमांकावर आधारित स्वस्त धान्य प्रणाली ही नवी पद्धत अवलंबण्याचा निर्णय झाला. त्यानुसार राज्यातील जालना, नागपूर, सोलापूर आणि वाशिम या जिल्ह्यात जानेवारीपासून रेशनिंग पोर्टेबिलिटी हा पथदर्शी प्रकल्प सुरू झाला. एका महिन्यात तब्बल 17 हजार 114 शिधापत्रिकाधारकांनी 

पोर्टेबिलिटीच्या सुविधेचा फायदा घेतला.शिधापत्रिकाधारकांना शहरातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या निर्धारित धान्याची उचल करता आली. प्रकल्पाचे यश पाहून सरकारने फेबु्रवारी महिन्यात कोल्हापूर, पुणे जिल्ह्यासह 10 जिल्ह्यांत पोर्टेबिलिटीची सुविधा दिली. मार्च महिन्यात आणखी आठ जिल्ह्यांत सेवा सुरू केल्यानंतर एप्रिलमध्ये हा आकडा 30 जिल्ह्यांपर्यंत पोहोचला. त्यात ठाणे, रायगड, नाशिक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. 4 लाख 35 हजार 435 शिधापत्रिकाधारकांनी आपल्या शहरातील कुठल्याही रेशनिंग दुकानात जाऊन धान्य खरेदी केलेले आहे. त्यामुळे एका दुकानात धान्य उपलब्ध नसल्यास अन्य दुकानातून धान्य उचल करून आपली गरज भागवली. 

मोबाईल पोर्टेबिलिटीप्रमाणे रेशनिंग दुकानातील धान्याचेही पोर्टेबिलिटी झाल्याने 1 मेपासून तब्बल 42 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. त्यात पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारासह अन्य 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. 19 मेपर्यंत 1 लाख 71 हजार 667 शिधापत्रिकाधारकांनी या सुविधेचा फायदा घेतला आहे. या नव्या प्रणालीमुळे बोगस शिधापत्रिकाधारकांकडून होणारी धान्य उचल थांबण्यास मदत झाली आहे.