Mon, Jun 17, 2019 04:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता राजकीय पक्षांचा पालिका शाळांच्या नामकरणाचा आग्रह

आता राजकीय पक्षांचा पालिका शाळांच्या नामकरणाचा आग्रह

Published On: Aug 25 2018 1:36AM | Last Updated: Aug 25 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी 

रस्ते, चौक, उद्यान, बाजार, हेरिटेज वास्तूंप्रमाणे आता मुंबई महापालिका शाळांचे नामकरण करण्याचा आग्रह सर्व राजकीय पक्षांनी धरला आहे. पण पालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिकेच्या अस्त्विात असलेल्या शाळांचे पुन्हा नामकरण करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. एवढेच नाही तर, पालिका सभागृहात मंजूर झालेला नामकरणाचा प्रस्तावही शिक्षण विभागाने फेटाळून लावला.

राजकीय पक्षांकडून कधी काय मागणी होईल, हे सांगता येत नाही. रस्ते, चौकाच्या नामकरणासाठी आग्रही असणार्‍या राजकीय पक्षांनी थेट आता पालिकेच्या शाळांच्या नामकरणासाठी धोरण निश्‍चित करण्याची मागणी केली आहे. याबाबतचा ठरावही मुंबई महापालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. पण पालिका शाळेय इमारतींना नाव देण्याबाबत शिक्षण विभागाचे धोरण नाही. परंतु शालेय इमारतींना दिलेली 90 टक्के नावे त्या भागातील रस्ते, ऐतिहासिक नेत्यांची आहेत. यात डॉ. आंबेडकर मार्ग मनपा शाळा, कस्तुरबा गांधी नगर मनपा शाळा, जवाहरलाल नगर मनपा शाळा, शहाजी राजे मार्ग मनपा शाळा असे नामकरण करण्यात आले आहे. 

रस्त्याला नावावरून शाळांना दिलेल्या नावामुळे पालकांना शाळेचा पत्त शोधणे सहज शक्य होते. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या शाळेंचे नामकरण करणे योग्य नाही. नाव बदलायचे झाल्यास त्याचे नावफलक, लेटरहेड बदलणे व विविध दस्ताऐवजामध्ये बदल नमूद करणे जिकरीचे आहे. त्यामुळे यापुढेही रस्त्याची नावे शाळांना देणे संयुक्तीक असल्याचे शिक्षण विभागाने आपल्या अभिप्रायमध्ये म्हटले आहे. पालिकेच्या या अभिप्रायमुळे शाळांचे नामकरणासाठी उत्सूक असलेल्या लोकप्रतिनिधींना मोठा दणका बसला आहे. तर दुसरीकडे रस्ते व चौक संपल्यामुळे राजकीय पक्षांनी आपला मोर्चा शाळेकडे वळवला का, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. 

शाळांची इंग्रजी नावे बदलण्यासाठी धोरण हवे 

पालिकेच्या काही शाळांना ऐतिहासिक महापुरुषांची नावे यापूर्वीच देण्यात आली आहेत. यात महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज यांचा समावेश आहे. पण धोबी तलाव फोर्ट येथील एका शाळेला लॉर्ड हॅरिस मनपा शाळा असे इंग्रजी नेत्याचे नाव देण्यात आले आहे. ते बदलण्यासाठी शाळांच्या नामकरणाचे धोरण असायला हवे, असे शिक्षण समितीचे म्हणणे आहे.