Sun, Jul 21, 2019 01:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासगी गुप्तहेरांवर आता पोलिसांचा डोळा

खासगी गुप्तहेरांवर आता पोलिसांचा डोळा

Published On: Mar 21 2018 2:19AM | Last Updated: Mar 21 2018 2:02AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मोबाईलमधील संभाषणाची चोरी करून (सीडीआर) त्याची विक्री केली जात असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे आता यापुढे राज्यातील सर्वच खासगी गुप्तहेर एजन्सींवर पोलीस नजर ठेवणार आहेत. तसेच  खासगी गुप्तहेर संस्थांच्या नियमनाचा कायदा करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

डॉ. पाटील म्हणाले, यवतमाळ येथील एका पोलीस कर्मचार्‍याने कॉल डेटा रेकॉर्ड म्हणजेच सीडीआरची विक्री केली. सीडीआरचा गैरवापर केल्याप्रकरणी  पोलिसांनी नितीन खवले व अजिंक्य नागरगोजे विरोधात गुन्हा दाखल करून 12 आरोपींना याप्रकरणी अटक केली. दूरसंचार विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कॉल रेकॉर्ड करता येत नाही. 

कॉल रेकॉर्ड करण्याचा अधिकार काही मोजक्या यंत्रणांकडे आहे. त्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांचा समावेेश आहे. त्यांच्याकडेच पासवर्ड असतो. या पासवर्डची चोरी करून नागरगोजेने सीडीआर विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. पासवर्ड हलगर्जीप्रकरणाची संबंधीत पोलीस अधीक्षकांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी पासवर्ड दर आठवड्याला बदलण्याच्या सूचना देण्यात येतील. राज्यातील  खासगी गुप्तहेर एजन्सी तसेच कॉल रेकॉर्ड करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या बेकायदेशीर उपकरणांचा आढावा घेऊन चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना  देण्यात येतील, असेही गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले.

शिवसेना गटनेते अनिल परब यांनी खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीच्या जाहिरातींवर बंदी घालणार का, नागरिकांच्या खासगी हक्कांना सरकार संरक्षण देणार का तसेच केंद्राचा कायदा येण्यापूर्वी राज्य सरकार काही पावले उचलणार का, अशी विचारणा केली. त्यावर डॉ. पाटील यांनी याबाबत तपासून निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.