Thu, Apr 25, 2019 23:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेतिकिटांवर स्थानकांची नावे आता मराठीतही!

रेल्वेतिकिटांवर स्थानकांची नावे आता मराठीतही!

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोणत्याही रेल्वेस्थानकातून तिकीट काढल्यास तिकिटावर सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानकांची नावे यापुढे मराठीतही छापली जाणार आहेत. यावर रेल्वेच्या क्रिसकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) काम सुरू असून एक मे या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात त्याची अंमलबजावणी करण्याची योजना आहे. मात्र, यात मराठी भाषेला हिंदी, इंग्रजीनंतर तिसरे स्थान देण्यात आले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिकिटांवरही मराठीत स्थानकांची नावे छापण्यात येणार आहेत.

सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेची तिकिटे आणि पासवर तसेच अनारक्षित गाड्यांच्या तिकिटांवर स्थानकांची नावे हिंदी, इंग्रजी भाषेतच असतात. स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. त्यानुसार रेल्वेत या धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. देशभरातील त्या-त्या राज्यातील स्थानिक भाषेला प्राधान्य देत रेल्वे तिकिटांवर स्थानकांची नावे स्थानिक भाषेनुसारही छापण्यात येत आहेत. कर्नाटकात त्याची अंमलबजावणी केल्यानंतर आता महाराष्ट्रातही या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सध्या स्थानकांची नावे ही तीन भाषांमध्ये आहेत. लोकल गाड्यांमधील उद्घोषणाही तीन भाषांतच होतात. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातून काढण्यात येणारे लोकलचे तिकीट असो वा पास किंवा महाराष्ट्रातील अन्य स्थानकातून काढण्यात येणारे रेल्वेचे अनारक्षित तिकीटही जरी असेल तरीही त्यावरील स्थानकाचे नाव मराठीतही छापले जाणार आहे.