Sat, Jun 06, 2020 20:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता एस.टी.चा प्रवासही महागला

आता एस.टी.चा प्रवासही महागला

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 2:28AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

एस. टी. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात येत्या 15 जूनपासून 18 टक्के इतकी वाढ करण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने होरपळलेल्या जनतेला आता एस. टी. भाडेवाढीचा फटका बसणार आहे. तसे एस. टी. महामंडळाने जाहीर केले आहे. डिझेलचे वाढते दर तसेच एस. टी. कामगारांना नुकतीच वेतनवाढ देण्यात आल्याने एस. टी.च्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली. त्यामुळे नाईलाजास्तव ही तिकीट दरवाढ करावी लागल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

यापुढे तिकिटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल, तर त्याऐवजी पाच रुपये आकारले जातील. तसेच आठ रुपये तिकीट असल्यास 10 रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्‍न सुटेल आणि वादावादी थांबेल, असे एस. टी. महामंडळाचे म्हणणे आहे.

तिकीट दरवाढीबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे परिवहन मंत्री आणि एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते म्हणाले, इंधनाच्या दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी सुमारे 460 कोटी रुपये इतका खर्च वाढला आहे. कामगारांसाठी नुकतीच 4 हजार 849 कोटी रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. यामुळे एस. टी. महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. तिकीट दरात 30 टक्के इतकी वाढ करावी, असे महामंडळाने प्रस्तावित केले होते. परंतु, प्रवाशांवर जास्त आर्थिक भार पडू नये म्हणून ही दरवाढ 30 टक्क्यांऐवजी 18 टक्के इतकी करण्याचा निर्णय अंतिमत: घेण्यात आला. हा निर्णयही नाईलाजास्तव घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने डिझेलवरील विविध कर माफ करावेत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकीट दरवाढीचा फेरविचार करण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.