Tue, Jan 22, 2019 17:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी !

आता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी !

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी 

पालिका कर्मचार्‍यांप्रमाणे नगरसेवकांची सभागृहातील उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्यास सोमवारी पालिकेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यातून महापौर व उपमहापौर यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांना पुढील महिन्यापासून चाप बसणार आहे. 

महापालिका सभागृहात मुंबईतील विविध प्रश्नावर साधक-बाधक चर्चा करून निर्णय घेतले जातात. अनेक धोरणात्मक निर्णयही सभागृहात घेतले जातात. पण या निर्णय प्रक्रीयेत अनेक नगरसेवकांचा सहभागच नसतो. त्यामुळे नगरसेवकाला निवडून देणार्‍या जनतेची ही फसवणूकच आहे. महापालिका सभागृहात नगरसेवक उपस्थित राहतात की नाही, यासाठी सभागृहाबाहेर नोंद वहीमध्ये (हजेरी पट) त्या नगरसेवकाची सही घेण्यात येते. पण  काही नगरसेवक बाहेर ठेवलेल्या हजेरी पटावर सह्या करून परस्पर घरी निघून जातात. तर काही नगरसेवक दोन दिवसानंतर येऊन नोंद वहित आपली सही करताना आढळून आले. त्यामुळे त्यांना पालिकेचे कामकाजच समजत नाही. तर दुसरीकडे सभागृहात नगरसेवकांची उपस्थिती दिसून येत नाही. 

कामचुकार नगरसेवकांना आळा घालण्यासाठी पालिका कर्मचार्‍यांच्या धर्तीवर पालिका सभागृहाबाहेर बायोमेट्रीक हजेरी मशीन बसवण्यात याव्यात. एवढेच नाही तर सीसीटिव्ही कॅमेरेही बसवण्यात यावे, अशी मागणी याकडे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. या संदर्भात गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेऊन करणे योग्य ठरेल, असे उत्तर पालिका प्रशासनाने दिले आहे. त्यानुसार सोमवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला गटनेत्यांनी एकमताने मंजूरी दिली. जो नगरसेवक सभागृहात हजर राहणार नाही, त्याचा भत्ता कापण्याचा निर्णयदेखील यावेळी घेण्यात आला.