Thu, Jun 27, 2019 16:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी स्काडा यंत्रणा 

आता सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी स्काडा यंत्रणा 

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 30 2018 1:01AMमुंबई : प्रतिनिधी 

महापालिकेच्या 7 टर्मिनल प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून तर समुद्रात सोडले जाते. या प्रक्रिया केंद्रांमध्ये आता संगणकीय प्रणाली आधारित स्काडा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे समुद्रात सोडल्या जाणार्‍या सांडपाण्याची माहिती तात्काळ स्वरुपात उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे ही माहिती महापालिकेच्या मलनिःसारण प्रचालन खात्यातील संबंधित अधिकार्‍यांच्या मोबाईलवर ऍन्ड्राईड ऍपच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे. त्यामुळे केंद्रांमधील यंत्रांचे परिरक्षण करण्यासह प्रतिबंधात्मक काळजी घेणे, आता अधिक सुलभ होत आहे. 

मुंबईत सकाळच्या वेळेत पाण्याचा वापर जास्त आहे. त्यामुळेच दर 24 तासात निर्माण होणार्‍या मलजल व सांडपाण्यापैकी सुमारे 25 टक्के सांडपाणी हे सकाळी 6 ते 10 या वेळेत निर्माण होते. या निर्माण होणार्‍या सांडपाणी व मलजलाचे व्यवस्थापन मुंबई महापालिकेद्वारे केले जाते. महापालिकेच्या मलनिःसारण प्रचालन खात्यांतर्गत 7 टर्मिनल प्रक्रिया केंद्रे आहेत. ही प्रक्रिया केंद्रे कुलाबा, वरळी, वांद्रे, वर्सेावा, मालाड, घाटकोपर व भांडुप येथे आहेत. या टर्मिनल प्रक्रिया केंद्रांना 43 सॅटेलाईट उदंचन केंद्रे जोडलेली आहेत. 7 टर्मिनल प्रक्रिया केंद्रांमधून दिवसभरात किती सांडपाणी समुद्रात फेकले जाते, याची माहिती एकत्रित पद्धतीने एकाच ठिकाणी मिळणे यापूर्वी शक्य नव्हते.

सांडपानी प्रक्रिया केंद्रामध्ये व उदंचन केंद्रांमध्ये उदंचन संयंत्रे सुमारे 6 ते 8 फूट उंचीचे व तेवढ्याच लांबी रुंदीचे अवाढव्य नॉन रिटर्नींग व्हॉल्व, सुमारे 25 फूट उंचीचे शाफ्ट यासारखी उपकरणे आहेत. या यंत्रांचे दैनंदिन स्वरुपात परिरक्षण करणे, प्रतिबंधात्मक काळजी घेणे कठीण होते, असे मलनिःसारण प्रचालन खात्याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी सांगितले. महापालिकेची सर्व म्हणजे 7 प्रक्रिया केंद्रे आणि वांद्रे प्रक्रिया केंद्राशी संलग्न असलेली 10 सॅटेलाईट उदंचन केंद्रे अशी 17 ठिकाणे ही अत्याधुनिक स्वरुपाच्या स्काडा या संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने संगणकीय प्रणाली, अल्ट्रासोनिक सिस्टीम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो सेन्सर्स, संगणकीय सर्व्हर आदींचा समावेश आहे. या यंत्रणेतील सर्व संगणक हे सिमकार्डद्वारे मोबाईल नेटवर्कशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे 17 ठिकाणी उपलब्ध होणार्‍या माहितीचे आदान प्रदान सहजपणे करता येत असल्याचेही यमगर यांनी सांगितले.