Wed, May 22, 2019 23:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत आता मोबाईल अ‍ॅपवर पार्किंग!

मुंबईत आता मोबाईल अ‍ॅपवर पार्किंग!

Published On: Sep 13 2018 2:14AM | Last Updated: Sep 13 2018 2:11AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंंबई शहरात पार्किंगसाठी जागा मिळणे मोठे नशीब समजले जाते. विशेषतः चारचाकी कुठे उभी करावी याची विवंचना वाहनधारकांना दररोज सतावत असते. पालिकेने आता या विवंचनेतून वाहनधारकांना थोडाफार दिलासा देण्याचे ठरवले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत दक्षिण मुंबईत 7 ठिकाणी ऑनलाईन पार्किंगची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार केले जाणार आहे. या 7 जागांमध्ये एरॉस सिनेमा, क्रॉफर्ड मार्केट, फ्लोरा फाऊंटन या ठिकाणांचा समावेश आहे. 

रेल्वे तिकीट बुकींग अ‍ॅपच्या धर्तीवर हे पार्किंग अ‍ॅप तयार केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने अ‍ॅप तयार करणार्‍या कंपन्यांना पाचारण केले आहे. या अ‍ॅपमध्ये उपलब्ध असलेले पार्किंगचे लॉट दर्शवले जातील. एका तासासाठी किंवा त्याहून अधिक काळासाठी आगाऊ बुकींग करता येईल. त्यासाठीचे शुल्क ऑनलाईन भरावे लागेल. त्याची पोचपावती तात्काळ मिळेल. ती दाखवून नियोजित पार्किंगच्या जागेवर गाडी पार्क करता येईल. सध्या लंडनसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीने असे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात स्वारस्य दाखवले होते. मात्र या निविदा प्रक्रियेत निकोप स्पर्धा व्हावी यासाठी आणखी कंपन्यांना आमंत्रित करण्याचे ठरवण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान ही पद्धत यशस्वी ठरू शकेल असे मुंबई विकास समितीचे वाहतूक तज्ज्ञ ए.व्ही.शेनॉय यांनी सांगितले. 2013 पासून वेबवर आधारित पार्किंग पद्धत सुरू करण्याचे प्रयत्न पालिकेने केले होते. मात्र त्याला यश मिळाले नव्हते.