Thu, Apr 25, 2019 04:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता दर महिन्याच्या 21 तारखेला योगदिन!

आता दर महिन्याच्या 21 तारखेला योगदिन!

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 12:53AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील शाळा महाविद्यालयात यादिवशी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असताना, याच धर्तीवर आता दर महिन्याच्या 21 तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, असे मत शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. राज्यभरातील क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी गुरुवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्री तावडे यांनी संवाद साधला. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या.

संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली असून या दिवशी योगदिन साजरा केला जातो. हा दिवस एक दिवस साजरा करण्यापेक्षा प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला शाळांमध्ये योग दिवस साजरा करावा आणि  किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना योग शिकवावा. महिन्याच्या 21 तारखेला सुट्टी असल्यास त्या तारखेच्या अगोदर किंवा नंतर योग दिवस साजरा करण्यात यावा. योगामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्याबरोबरच आजच्या धावपळीत आवश्यक असणारी चपळता, एकाग्रता वाढण्यास मदत होते. हे विद्यार्थ्यांना समजून सांगणे आवश्यक आहे असेही यावेळी मंत्री तावडे यांनी सांगितले.

फोटो एकाच संकेतस्थळावर!

योग दिनानिमित्त राज्यभरात होणार्‍या कार्यक्रमाचे फोटो एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात यावे आणि त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार कण्यात यावे. योग दिन फक्त 21 जून रोजीच साजरा करून उद्दिष्ट साध्य होणार नाही. तरी या दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये योग महोत्सव आयोजित करणे आणि यानिमित्ताने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी 21 जून रोजी योगदिन शाळांमध्ये कशा पध्दतीने साजरा होणार आहे, यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती 16 जूनपर्यंत शिक्षण आयुक्तांना द्यावी, अशा सूचनाही मंत्री तावडे यांनी दिल्या.