Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलच्या  फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना आता  नो एंट्री

लोकलच्या  फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना आता  नो एंट्री

Published On: Apr 26 2018 2:00AM | Last Updated: Apr 26 2018 1:54AMमुंबई : प्रतिनिधी

उपनगरीय लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्‍चिम रेल्वेच्या फर्स्ट क्‍लासमधून यापुढे मुंबई पोलिसांना वैध पास किंवा तिकिटांशिवाय प्रवास करु नये, असे आदेशच मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी काढले आहे. त्यामुळे यापुढे फर्स्ट क्‍लासमध्ये मुंबई पोलिसांना नो एंट्री असणार आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी फर्स्ट क्‍लासमध्ये वैध पास अथवा तिकिटाशिवाय प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. 

लोकल गाड्यांचे फर्स्ट क्‍लास डब्यातून प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून लोकल,  मेल आणि एक्सप्रेस या गाड्यांमध्ये फर्स्ट क्‍लासचे डब्बे वेगळे ठेवले आहे. अनेकदा ड्युटीवर येताना आणि जाताना काही पोलीस अधिकारी या डब्ब्यातून वैध तिकिटाशिवाय प्रवास करताना तिकिट तपासनीस यांना दिसून आले आहेत. पोलीस असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत नव्हती. मात्र, गेल्या काही महिन्यांत ड्युटीवर नसतानाही काही पोलीस अधिकारी फर्स्ट क्‍लासचा प्रवासादरम्यान वापर करताना दिसून आले.

काही महिन्यांपूर्वी दादर रेल्वे स्थानकात एका पोलीस शिपायासोबत काही तिकिट तपासणीस यांच्यात हाणामारी झाली होती. हा पोलीस शिपाई ऑन ड्युटी नव्हता, तरीही त्याने कुर्ला-दादर असा प्रवास फर्स्ट क्‍लासने केला होता. यावेळी आपण पोलीस असल्याचे सांगून त्याने तिकिट तपासनीस यांच्याशी वाद घातला होता. अखेर दादर रेल्वे पोलिसांनी दोन परस्परगुन्हे दाखल केले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत या शिपायाला पोलीस सेवेतून निलंबित केले होते. या आदेशात वैध पास किंवा तिकिटांशिवाय यापुढे कुठल्याही पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी फर्स्ट क्‍लासच्या डब्ब्यातून प्रवास करु नये. जेणेकरुन या डब्ब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा मानसिक व शारीरिक त्रास होणार नाही. तसेच या व्यक्तींशी पोलिसांनी व्यवस्थित वागावे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. इतकेच नव्हे तर हा आदेश सर्व पोलीस ठाण्यासह इतर विभागातील प्रभारी अधिकार्‍यांनी सर्वच पोलिसांना वाचून दाखवावा आणि त्याप्रमाणे कारवाई करावी असे नमूद केले आहे.

Tags : Mumbai, Mumbai news, Now no entry,  police,  first class local,