Sun, Mar 24, 2019 23:48
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता शेतकर्‍यांनाही आरक्षण द्या : शरद पवार

आता शेतकर्‍यांनाही आरक्षण द्या : शरद पवार

Published On: Feb 28 2018 2:17AM | Last Updated: Feb 28 2018 1:59AMमुंबई : खास प्रतिनिधी

आर्थिक निकषांवरच यापुढे आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका पुण्यातल्या मुलाखतीत मांडल्यानंतर आता आर्थिक निकषांसोबतच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास शेतकर्‍यांनाही आरक्षण देण्याची गरज आहे, अशी नवी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी घेतली. पवार यांच्या या भूमिकेमुळे नवाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, सधन वगैरे शेतकर्‍यांना आरक्षण देण्याची गरज नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.   

पुण्यात गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी पवार यांची जाहीर मुलाखत घेतली होती.या मुलाखतीत आरक्षणविषयक प्रश्‍न ठाकरे यांनी विचारला असता, यापुढे जातनिहाय नव्हे, तर आर्थिक निकष लावूनच आरक्षण दिले जावे असे पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका होत होती. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी मुंबईत बोलताना पवार यांनी नवीनच भूमिका मांडल्याने आणखी गोंधळ होण्याची शक्यता आहे. 

शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असून दोन एकरांपेक्षा कमी शेतजमीन असलेले 82 टक्के शेतकरी आहेत, तर 70-72 टक्के शेतीला पाणीच मिळत नसल्याने  शेतकरीवर्गच अडचणीत आला आहे. त्यामुळे आर्थिक निकषांबरोबरच शेती व्यवसाय करणार्‍यांनाही शेतकरी म्हणून आरक्षण द्यायला हवे, अशी सूचना आपल्याकडे आली असून त्यावर विचार होण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.  आरक्षणाबद्दल तुमची भूमिका बदलल्याचे निदर्शनास आणून देताच पवार म्हणाले, की महाराष्ट्रात मंडल आयोगाची देशात सर्वप्रथम अंमलबजावणी मी मुख्यमंत्री असताना झाली, महिला आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हाही मी मुख्यमंत्री होतो. त्यामुळे माझी भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे.