Thu, Apr 25, 2019 17:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता एस.टी. प्रवासही महागणार!

आता एस.टी. प्रवासही महागणार!

Published On: May 23 2018 1:51AM | Last Updated: May 23 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

कर्नाटक निवडणुकीनंतर सातत्याने वाढणार्‍या इंधनाच्या दरामुळे सामान्यांचा एस.टी. प्रवास आता महागणार आहे. एस.टी.समोर अपरिहार्य तिकीट दरवाढीचे चिन्ह असून, लवकरच एस.टी. प्रशासन तिकीट दरवाढ करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहेे. एस.टी. महामंडळाला तब्बल 2 हजार 300 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे.

गेल्यावर्षी मेमध्ये एस.टी.ला मिळणार्‍या डिझेलचा दर हा सरासरी 58.02 रुपये इतका होता. तो यावर्षीच्या मे महिन्यात सरासरी 68.39 रुपये एवढा झाला आहे. त्यामुळे प्रतिलिटर 10.38 रुपये इतका जादा झाला आहे. वाढत्या डिझेल किमतीमुळे दिवसेंदिवस इंधन खर्चात वाढ होत असल्याने महामंडळाला तब्बल 2 हजार 300 कोटी रुपये संचित तोटा झाला आहे. एस.टी.ला यावर्षी केवळ इंधन दरवाढीमुळे 460 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. याचबरोबर इतकाच भार एस.टी.तील सुमारे 1 लाख कर्मचार्‍यांच्या होणार्‍या पगारवाढीमुळे भविष्यात सहन करावा लागणार आहे. दुरुस्ती साहित्याच्या सातत्याने वाढणार्‍या किमती, तसेच महामार्गावरील टोल दरवाढीचा अतिरिक्त भार एस.टी.वर पडत आहे.

गेले सहा महिने सातत्याने डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत असूनदेखील केवळ ऐन गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तिकीट दरवाढीची झळ बसू नये म्हणून एस.टी.ने आतापर्यंत तिकीट दरवाढ करण्याचे टाळले आहे. 

यापूर्वी जुलै ते ऑगस्ट 2014 मध्ये एस.टी.ची भाडेवाढ झाली होती. आता मात्र सातत्याने होणारी डिझेल दरवाढ कुठे थांबेल, हे निश्‍चित नसल्याने एस.टी.ला नाइलाजास्तव तिकीट भाडेवाढ करणे अपरिहार्य बनले आहे. वाढत्या डिझेलच्या किमतीचा विचार करून एस.टी. प्रशासन लवकरच आपोआप भाडेवाढीच्या सूत्रानुसार तिकीट भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती एस.टी. महामंडळाने दिली आहे.

मुंबईतील टॅक्सी, रिक्षा प्रवाशांना दिलासा

डिझेल, पेट्रोलवर चालणार्‍या टॅक्सी, रिक्षा वर्ष 2003 पासून सीएनजी गॅसवर चालवल्या जात आहेत. डिझेल, पेट्रोलचे दर जरी सातत्याने वाढत असले, तरी गॅसच्या किमती सद्यस्थितीत स्थिर असल्याने आम्ही प्रवासी भाडेवाढ करू इच्छित नाही. मात्र, गॅसचे दर जर अशा पद्धतीने वाढणार असतील, तर त्याचा विचार करून भाडेवाढ केली जाईल, असे बॉम्बे टॅक्सी मेन्स युनियनचे जनरल सेक्रेटरी ए. एल. क्वॉड्रोस यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.