Mon, Jun 17, 2019 02:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  धार्मिक स्थळांसाठी आता ‘एनओसी’ आवश्यक

 धार्मिक स्थळांसाठी आता ‘एनओसी’ आवश्यक

Published On: May 14 2018 1:53AM | Last Updated: May 14 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

धार्मिक देवस्थानांच्या जागेवरून निर्माण होणारे वाद तसेच शासकीय किंवा खासगी जागेवरील धार्मिक स्थळाचे स्थानांतर करायचे असल्यास येणार्‍या अडचणी तसेच समाजकंटकांद्वारे एखाद्या ठिकाणी विटंबना झाल्यास निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न विचारात घेता यापुढे धार्मिक स्थळाच्या कोणत्याही स्वरुपाच्या बांधकामासाठी गृह विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रापंचायत क्षेत्रातील धार्मिक स्थळांचे नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम किंवा पुनर्बांंधणी करण्यापूर्वी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेण्यात यावी. 

ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत धार्मिक स्थळाचे बांधकाम करण्यात येत असेल त्यांनी बांधकाम आराखड्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यापूर्वी प्रशासकीय विभाग म्हणून नगरविकास किंवा महसूल विभागाकडे पाठवावेत. 

या विभागांनी कायदा व सुव्यवस्था व रहदारीच्या अनुषंगाने गृह विभागाकडे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केल्यास संबंधित पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, महासंचालकांचे अभिप्राय घेऊन ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल. गृह विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय धार्मिक स्थळाचे कोणत्या स्वरुपाचे बांधकाम करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.