Sun, May 26, 2019 09:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबरनाथमधील ‘त्या’ जीन्स कारखान्यांना नोटीस !

अंबरनाथमधील ‘त्या’ जीन्स कारखान्यांना नोटीस !

Published On: Feb 12 2018 2:18AM | Last Updated: Feb 12 2018 1:40AMअंबरनाथ : प्रतिनिधी

उल्हासनगरमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता जीन्स कारखान्यांतील केमिकल वेस्ट थेट वॉलधुनी नदीत सोडण्यात येत असल्याने नदी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांवर बंदीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे यातील अनेक कारखाने छुप्या पद्धतीने अंबरनाथ व बदलापुरात सुरू करण्यात आले होते. याबाबत दै. पुढारीने ‘उल्हासनगरचे जीन्सवॉश आता अंबरनाथमध्ये’ या मथळ्याखाली 7 फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेवून एमपीसीबीने अंबरनाथमधील जीन्स कारखान्यांना नोटीस बजावली आहे. असे असले तरी या छुप्या जीन्स कारखान्यांवर कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात न आल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

उल्हासनगरातील 500 पेक्षा जास्त जीन्सवॉश कारखान्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यानंतर या जीन्स कारखान्यांनी छुप्या पद्धतीने अंबरनाथमध्ये जीन्स वॉशचे काम सुरू केले होते. विशेष म्हणजे हे जीन्सवॉश कारखाने निर्माण होणारे केमिकल वेस्ट थेट ड्रेनेज व जमिनीत मुरवत असल्याचे समोर आले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच एमपीसीबी आणि अंबरनाथ नगरपरिषदेने एकत्र कारवाई करून संबंधित जीन्सवॉश कारखान्यांना नोटीस बाजावली आहे. या कारवाईत अंबरनाथ पश्‍चिम भागातील बुवापाडा परिसरातील तीन जीन्सवॉश कारखान्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांगण्यात आले.