मान्सूनचा मुक्काम अलिबागमध्येच!

Published On: Jun 26 2019 2:00AM | Last Updated: Jun 26 2019 1:48AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अलिबागपर्यंत दाखल झालेला मान्सून अजूनही मुंबईत आलेला नाही. मात्र येत्या 24 ते 48 तासांत तो मुंबईवरही बरसू लागेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सोमवारी मान्सून खरे तर मुंबईत दाखल होणार होता. मात्र यंदा उशिरा येण्याचा विक्रमच नोंदवण्याचे त्याने ठरवलेले दिसते. त्याचा हा उशीर गेल्या 45 वर्षांतील विक्रमी समजला जातो. 1974 ला तो मुंबईत 28 जूनला तर 2009 साली 24 जूनला आला होता. या वर्षी तो आता 26 किंवा 27 जूनचा मुहूर्त गाठण्याची चिन्हे आहेत. 

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तुरळक सरी बरसल्या असल्या तरी तो मान्सून नव्हे. चोवीस तासांत किमान 2.5 मिमि पाऊस नोंदवला गेला तर मान्सून दाखल झाला असे हवामान खाते मानते. 85 ते 90 टक्के महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी फिरायला गेलेल्या पर्यटकांसारखा हाच मान्सून अलिबागमध्येच रमला असून तेथूनच तो मुंबईत येणार आहे.